कणकवली : तब्बल ४० वर्षांपूर्वीच्या डी.एड. कॉलेजमधील जीवनाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सौ. इंगेट्राऊट नाईक अध्यापक विद्यालय, कणकवलीच्या सन 1984 बॅचचे विद्यार्थी ‘स्मृतींचा चैत्रमोहर! ’ या टॅगलाईनखाली पुर्नभेट सोहळ्याच्या निमित्ताने जानवली येथील हॉटेल नीलम कंट्रीसाईटमध्ये एकत्र आले. यात संवाद, गप्पाटप्पा, जुन्या आठवणींना उजाळा देत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत जीवलग सवंगड्यांनी ‘ओ भी क्या दिन थे.!’ म्हणत धम्माल केल्यामुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरला.

डी. एड. ची परीक्षा पासआऊट झाल्यानंतर बॅचमधील प्रत्येक विद्यार्थी विखुरलेला होता. तब्बल .40..वर्षानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याचा शोध घेऊन वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेले उपक्रमशील शिक्षक त्रिंबक आजगांवकर यांनी ‘D. ed. 1984’ या नावाचा कणकवलीच्या डी. एड. कॉलेज सन १९८४ बॅचच्या व्हॉट्सअॅप ग्रुप बनवला. ग्रुपवर सर्वांशी चर्चा करून आणि प्रत्यक्ष संपर्क साधून दिनांक २९ ऑक्टोबर २०२३ रोजी ‘स्मृतींचा चैत्रमोहर’ या टॅगलाईन खाली पुर्नभेट सोहळा नीलम कंट्रीसाईटमध्ये आयोजित करण्याचे ठरले. त्यानुसार हा आठवणींचा सोहळा दमदारपणे पार पडला अन् त्यात उपस्थित सर्वजण डी.एड. कॉलेजच्या लाईफ विश्वात काही क्षणांसाठी पुन्हा रमले.

एकत्र संवाद, गप्पाटप्पा रंगल्या. यामध्ये विद्यार्थ्यांनी डी. एड. कॉलेज लाईफच्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या. त्या लाईफमध्ये घडलेले प्रसंग एकमेकांना शेअर करत काही काळासाठी सर्व पुन्हा कॉलेजच्या विश्वास रमले.
दुपारच्या सत्रात सर्वांनी एकत्रित स्नेहभोजन करत वनभोजनाच्या वातावरणाचा माहोल काही क्षणांसाठी अनुभवला. या बॅचच्या विद्यार्थ्यांनी स्नेहमेळाव्या सोहळ्यात त्या वेळेच्या शिक्षक असलेल्या श्रीमती आपटे, श्री. जाधव , लिपिक श्री. मुसळे व राणे, शिपाई कदम व जाधव यांना निमंत्रित केले होते. बॅचतर्फे त्यांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू व जास्वंदीचे रोपटे देऊन सन्मान केला. सर्वांच्या उपस्थितीत आरंभी विद्येची देवता सरस्वती मातेच्या मूर्तीचे पूजन
करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून विद्यार्थ्यांनी प्रार्थना व श्लोक म्हटले. तत्पूर्वी शाळेची घंटा वाजवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात
आली.
दरम्यान, श्री. आपटे, जाधव, मुसळे राणे व कदम या सर्व महानुभवांनी त्या वेळेच्या आठवणींना उजाळा दिला. ४० वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांमध्ये स्वतःचे गाजवले कर्तृत्व पाहून या सर्वांचे मन अभिमानाने भरून आले होते. पुर्नभेटीच्या या सोहळ्यानिमित्त पुन्हा एकत्र आलेल्या क्लासमेटच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता अन् मनात हर्षोनंद झाला होता. स्मृतीचा चैत्र्यमोहर अविस्मरणीय रहावा, म्हणून नलिनी भोगटे या विद्यार्थिनीने सर्वांना
निरंजन तर आजगांवकर व मळगांवकर या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षक व क्लासमेट यांना १९८४ च्या बॅचमधील विद्यार्थ्यांचा ग्रुप फोटोची प्रत भेट म्हणून दिली.
प्रास्ताविक त्रिबंक आजगांवकर यांनी केले. सूत्रसंचालन विलास मळगांवकर यांनी केले. आभार नलिनी भोगटे यांनी मानले.
शेवटी जाधव सरांच्या आग्रहाखातर पुढील गेट टू गेदर इचलकंरजी येथे घेण्याचे सर्वानुमते ठरले. या सोहळ्यात ४० पैकी ३० विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
क्लासमेट गायनाने सर्वच मंत्रमुग्ध !
‘स्मृतींचा चैत्र्यमोहर’ ही टॅगलाईन असलेल्या पुर्नभेट सोहळ्यात महेश काणेकर प्रस्तृत स्वरसंदेश कराओके या संगीतमय कार्यक्रमांत महेश काणेकर, सुवर्णा दळवी, वंदना हर्णे, जाधव सरांनी सुरेल गायनाने सर्वाना मंत्रमुग्ध केले. आपल्या क्लासमेट यांनी गायिलेल्या गाण्यांना उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली. त्यामुळे पुढील वर्षी याच उत्साहाने एकत्र येण्याच स्वप्न उराशी बाळगून सर्वजण माघारी परतले.
विलास मळगावकर, त्रिंबक आजगावकर, महेश काणेकर, संजय पाटील, अनिल आजगेकर, आनंद तांबे, उषा दळवी, सुनिता तिरपणकर, सुलभा चव्हाण – राणे, प्रतिमा कुलकर्णी, सुनिता बुचडे, लता कडूळकर, शकुंतला सावंत, रत्नप्रभा निमकर, शिला मालडीकर, मंगल पवार, संगीता गावडे, उषा मुळीक, कल्पना जामदार, छाया नाडकर्णी, अलका राणे, वंदना सावंत, लता सावंत, माधवी कुलकर्णी यांच्या उपस्थितीने संपूर्ण कार्यक्रमात बहर आणला आणि अनेक वर्षांनी भेटलेल्या सवंगड्यांनी आपला स्मृतिगंध हृदयात जोपासून एकमेकांना अश्रूपूर्ण निरोप देत ‘पुन्हा लवकरच भेटूया.!’ असा संकल्प निश्चित केला.





