पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर नळपाणी योजना दुरुस्तीला प्राधान्य.! – नगराध्यक्षा साक्षी प्रभू. ; देवगड – जामसंडे नगरपंचायत सर्वसाधारण मासिक सभा संपन्न.

24

देवगड : देवगड – जामसंडे नगरपंचायतमधील कार्यान्वित असलेल्या पाणीपुरवठा योजनेसाठी नवीन पंप व मोटर खरेदी करण्यास नगरपंचायतच्या मासिक सभेत मंजुरी देण्यात आली. देवगड मधील महत्त्वाच्या पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आपण तत्पर असून यासाठी वारंवार पाठपुरावा करत आहे. अशी माहिती देवगड जामसंडे नगरपंचायत नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी आजच्या मासिक सभेत दिली.देवगड जामसंडे नगरपंचायतीची मासिक सभा नगरपंचायतीच्या सभागृहात नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला उपनगराध्यक्ष मिताली सावंत, मुख्याधिकारी अधिकारी सुरज कांबळे, बांधकाम सभापती तेजस मामघाडी, स्वच्छता व आरोग्य सभापती विशाल मांजरेकर, पाणीपुरवठा सभापती संतोष तारी उपस्थित होते.
नगरपंचायतीच्या सभेत नगरसेवक नितीन बांदेकर यांनी नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील कामांसाठी मर्यादित न राहता नगरपंचायत हद्दीतील रस्ते पाणी हे महत्त्वपूर्ण प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी माहिती त्यांनी सभेत सूचित केली. यावेळी नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांनी आपण शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर देवगड जामसंडे शहराच्या प्रथम नागरिक म्हणून नगरपंचायतीच्या सर्व प्रभागातील कामे ही प्राधान्याने होतील यासाठी प्रयत्नशील असून याबाबत मुख्यमंत्री यांच्याकडे तशी मागणी ही केली आहे. त्याचबरोबर देवगड जामसंडे शहराचा ज्वलंत असणारा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आपण वारंवार मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करीत असून पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आपण तत्पर आहोत असेही नगराध्यक्षा प्रभू यांनी सांगितले.
नगरपंचायत मालकीच्या खुल्या क्षेत्रावर अनधिकृत बांधकाम संदर्भात कारवाई करण्याचा विषय सभागृहात चर्चेला आला यावेळी मुख्याधिकारी सुरज कांबळे यांनी खुल्या क्षेत्रावर असलेली अनधिकृत बांधकामे तसेच इतर अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे यांच्यावर कारवाई करण्यासाठी आर्थिक तरतुदीची गरज आहे असे सभागृहात सांगितले यावर भाजप गटनेते शरद ठुकरुल यांनी प्रथमत: नगरपंचायत खुल्या क्षेत्रावर असलेली अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे यांचा सर्वे करून तसा अहवाल पुढील सभेत सादर करावा. त्यानंतरचं हा विषय चर्चेसाठी घ्यावा अशी सूचना ही यावेळी त्यांनी केली.
नगरसेविका सौ अरुणा पाटकर यांनी प्रभाग 14 मध्ये विंधन विहिरीसाठी दहा लाखाचा निधी उपलब्ध आहे मात्र काम करण्यासाठी परवानगी द्यावी व तांत्रिक मंजुरीचा ठराव द्यावा अशी मागणी त्यांनी केली. यावेळी नगराध्यक्ष प्रभू यांनी ज्या खुल्या क्षेत्रात विंधन विहीर मागणी होत आहे ते क्षेत्र मोजणी करण्यासाठी अर्ज केला आहे. मोजणी होऊन जागा निश्चिती झाल्यानंतर त्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल असे यावेळी सांगितले .प्रभाग पाच मध्ये प्रबुद्ध नगर येथे नवीन ट्रान्सफार्मर बसविण्याचा ठराव आजच्या सभेत घेण्यात आला. नगराध्यक्षा यांच्याकडे नगरसेवक यांनी विकासकामांबाबत दिलेल्या अर्जावर चर्चा करण्यात आली. यावेळी प्रभाग सातचे नगरसेवक रोहन खेडेकर यांनी नगराध्यक्षा यांना दिलेल्या अर्जामध्ये देवगड जामसंडे नगरपंचायतसाठी नगरपंचायत हद्दीत कोंडवाडा बांधणे, व कचरा डेपोसाठी जागा खरेदी करणे, नगरपंचायत मालकीचे मासळी व भाजी मार्केट बांधणे, नगरपंचायत कार्यालयासाठी नवीन इमारत बांधणे, या कामांचे ठराव सभेत घ्यावे अशी मागणी केली. त्याचबरोबर भाजपा गटनेते शरद ठुकरुल यांनीही याच कामांची नगराध्यक्षांकडे मागणी केली.
लेखापरीक्षण अहवालात मक्तेदारांकडून वसूल करण्यात येणारी दंडाची लाखो रुपयाची रक्कम अद्यापही वसूल करण्यात आलेली नाही. याबाबत नगरसेवक नितीन बांदेकर यांनी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करीत प्रशासनावर कोणाचा दबाव आहे का असा खडा सवाल उपस्थित केला.कचरा प्रश्न व बंद असलेल्या गाड्या याबाबतच्या विषय सभेत नगरसेवक नितीन बांदेकर, नगरसेविका सौ तन्वी चांदोस्कर, गटनेते शरद ठुकरुल यांनी उपस्थित केला.