आंध्र प्रदेशात भीषण रेल्वे अपघात, ६ ठार!

104

विजयनगर : आंध्र प्रदेशातील विजयनगरममध्ये दोन रेल्वे गाड्यांमध्ये धडक झाली आहे. पॅसेंजर ट्रेन उभी होती त्याचवेळी मागून दुसरी पॅसेंजर ट्रेन आली. मागून आलेल्या धडकेत पॅसेंजर ट्रेनच्या तीन बोगी रुळावरून घसरल्या. या दुर्घटनेत आतापर्यंत 6 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अपघातानंतर मदत आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर (ट्रेन क्र. ०८५०४) विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर (ट्रेन क्र. ०८५३२) कोथवलसा ‘मंडल’ येथे कंटकपल्लीच्या टक्करानंतर रुळावरून घसरली. या घटनेबाबत, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी तात्काळ मदत उपाययोजना करण्याचे आणि विजयनगरमजवळील जिल्ह्यांमधून शक्य तितक्या रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.

नेमकं काय घडलं?

विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर ट्रेन ओव्हरहेड केबल कट झाल्यामुळे उभी होती. त्याचवेळी विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर ट्रेन त्याच रुळावर मागून येऊन धडकली. या धडकेनंतर पॅसेंजर ट्रेनच्या तीन बोगी रुळावरून घसरल्या. ही धडक इतकी जोरदार होती की एका बोगीचे मोठे नुकसान झाले.  या अपघातात पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफला देण्यात आली आहे. अपघात निवारण गाडीही घटनास्थळी पोहोचली आहे. जखमींना रुग्णवाहिकेतून स्थानिक रुग्णालयात नेण्यात येत आहे, अशी माहिती या घटनेबाबत विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी दिली आहे.