गटार साफ करताना मृत्यू झाल्यास सरकारने कुटुंबाला ३० लाख रुपये द्यावेत.! – सुप्रीम कोर्ट.

40

नवी दिल्ली : गटार साफ करताना होणाऱ्या मृत्यूप्रकरणात सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केलीये. तसेच याप्रकरणी सरकारविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी म्हटलं की, गटार साफ करताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुबांला सरकारने ३० लाखांची नुकसान भरपाई द्यावी. तसेच यामध्ये अपंगत्व आल्यास आर्थिक मदत करण्याचे निर्देश कोर्टाने दिले.

न्यायमूर्ती एस रवींद्र भट आणि न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या पीठाने याप्रकरणी सुनावणी घेतली. यावेळी कोर्टाने सांगितलं की, गटार साफ करत असताना अनेकदा त्या व्यक्तीला स्थायी अपंगत्व येतं. अशावेळी कमीतकमी मदत म्हणून अशा कर्मचाऱ्याला २० लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी. दोन न्यायमूर्तींच्या पीठाने सांगितलं की, हातांनी गटार साफ करणे किंवा हातांनी मैला साफ करण्याची प्रथा पूर्णपणे बंद व्हावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी व्यवस्था करावी. निर्णय देताना कोर्टाने म्हटलं की, स्वच्छता कर्मचाऱ्याला अन्य कोणते अपगंत्व आले तर सरकारी अधिकाऱ्यांनी त्याला १० लाख रुपयांची मदत करावी.