विशाल प्रभाकर परब …!
एक हसमुख, शांत, संयमी, मितभाषी अन् जिंदादिल व्यक्तिमत्व..!
खरंतर जेवढ्या अल्पावधीत विशाल परब यांनी आपल्या कौशल्याने आणि स्वभावाने उद्योग क्षेत्रात गरुडझेप घेतली त्याहीपेक्षा कमी कालावधीत त्यांनी एकापेक्षा एक अशा दर्जेदार ऐतिहासिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील वैविध्यपूर्ण कार्यक्रम राबवून संपूर्ण कोकणचा सांस्कृतिक कार्यक्रमांचा इतिहासच बदलून टाकला आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. काल रविवारी ज्या पद्धतीने सावंतवाडी शहरात युवकांचे आयडॉल असलेले, आवडते गायक जुबीन नौटीयाल यांसीच्या लाईव्ह शोचे आयोजन विशाल परब आणि त्यांच्या शिलेदारांनी केले ते ‘न भूतो न भविष्यती.!’ अशा पद्धतीचे होते.
यापूर्वीही सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम राबविले गेले आहेत. मात्र कालचा जुबीन यांचा लाईव्ह शो हा इतिहास घडवून गेला अशाच पद्धतीचा हा शो होता. यापूर्वी देखील विशाल परब यांनी छत्रपती शिवरायांवर असलेले ऐतिहासिक महानाट्य कुडाळ येथे गेल्या वर्षी सिंधुदुर्गवासियांसाठी मेजवानी म्हणून पेश केले आणि त्याही वेळी विशाल परब यांच्या आयोजन आणि नियोजनाच्या अनुषंगाने संपूर्ण कोकणात त्यांच्या नावाची चर्चा रंगू लागली.
खरंतर केवळ कार्यक्रम घेणे एवढ्यावरच न थांबता कार्यक्रमासाठी आलेल्या प्रत्येक ज्येष्ठ, श्रेष्ठ भाजप पक्ष असो किंवा इतरही पक्षातील आपले हितचिंतक. यांचे स्वागत विशाल परब आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ज्या पद्धतीने केले ते निश्चितच आदर्शवत आहे. आलेल्या प्रत्येकाला ”या साहेब…स्वागत आहे आपलं..!” या शब्दांनी ‘विशाल’ जिंकत आहेत. अवकाशात झेप घेण्यासारखी केलेली प्रगती आणि तरीही ‘डोक्यावर बर्फ’ आणि ‘मुखात साक्षात पेढा’ घेऊन हा युवकांचा आवडता ‘विशाल’ मनानेही तेवढाच विशाल आहे.! केवळ युवकांसाठीच नाही तर महिला भगिनींसाठी, युवा क्रीडापटूंसाठी, कलावंतांसाठी, आणि येथील जनसामान्यांच्या आरोग्यासाठी देखील विशाल परब यांनी वारंवार पुढाकार घेऊन विधायक उपक्रम राबविण्याचा धडाका लावलेला दिसतो.
मात्र आता जे विशालला जमले ते कोकणातील अनेकांना का जमले नाही? किंवा का जमत नाही?, असाही एक सूर सामान्य नागरिकांमधून आता वारंवार उमटताना दिसतो आणि तो सूर येणे स्वाभाविकच आहे. कारण आपल्या कोकणच्या भोळ्या बापळ्या जनतेने अनेकांना जनसेवेची संधी दिली. मात्र जनतेच्या विकासासाठी आणि येथील युवकांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या अनुषंगाने विधायक उपक्रम फार कमी लोकांनी राबविलेले दिसतात. या सर्वांमध्ये आजघडीला अव्वल स्थानावर विराजमान होतात ते विशाल परबचं…!
रविवारी झालेल्या लाईव्ह कन्सर्ट शो दरम्यान उपस्थित असलेल्या अनेकांना विशाल परब यांचे नियोजन वरवर जरी छान वाटत असले तरी अनेकांना आतून कुठेतरी सल जाणवत होती. हे अनेकांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर उपस्थित जनसामान्यांना कळून चुकले.
मात्र, वाचक मित्रहो चांगल्या काम करणाऱ्या व्यक्तीलाच कुठेतरी आडवे करण्यासाठी आपल्यातीलच जवळच्या लोकांकडून पद्धतशीर नियोजन केले जाते. म्हणून आगामी काळात विशाल परब यांनी आपले प्रत्येक पाऊल हे सावधानतेने टाकणेही तेवढेच या निमित्ताने गरजेचे वाटते. हा केवळ एक सल्ला नसून आजपर्यंतच्या अनेक कमी वयात यशस्वी झालेल्या अनेक व्यक्तींच्या जीवनात नंतरच्या काळात आलेले भूकंप यांचा अनुभवाधिष्ठीत इतिहास आहे. असो.., आगामी काळ विशाल परब यांच्या कार्याची दिशा निश्चित करेल. मात्र ज्या पद्धतीने गेल्या दोन-तीन वर्षात विशाल परब हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या ‘विशाल उपक्रमांमुळे’ परिचित झाले आहे. ते केवळ सिंधुदुर्गसाठी नव्हे तर कोकणवासियांसाठीही अभिमानास्पद आहे, हे नक्कीच नाकारून चालणार नाही. आज विशाल परब यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून स्वतःचे खंबीर व दमदार, असं व्यक्तिमत्व सिद्ध केला आहे आणि म्हणूनच त्यांच्या वाढदिवसाला दिग्गजांची मांदियाळी जमली होती.
वाढदिवसाला ‘विशाल’ दिग्गजांची मांदियाळी..!
सिंधुदुर्गचे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांचा वाढदिवस रविवारी सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर आयोजित जुबिन नौटियाल यांच्या लाईव्ह कन्सर्ट कार्यक्रमादरम्यान साजरा करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, केंद्रीय मंत्री भागवत कराड, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, गोव्याचे आमदार चंद्रकांत शेटये, माजी आमदार राजन तेली, प्रमोद जठार, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, विशाल परब यांचे पिताश्री प्रभाकर परब, सुविद्य पत्नी सौ. वेदिका परब व परब कुटुंबिय, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, भारतीय जनता पार्टी महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, तसेच भारतीय जनता पार्टीचे सावंतवाडी जिल्ह्यातील असंख्य नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच भाजपचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत व हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने दिमाखदारपणे साजरा करण्यात आला. यावेळी अनेकांनी विशाल परब हे नाव आता दिल्लीत गाजू देत, अशा शुभेच्छा देत विशाल परब यांच्या विविध उपक्रमांचे तोंड भरून कौतुक केले.
अनेक राजकीय बड्या नेत्यांनी विशाल परब यांच्या कार्याचा हजारोंच्या साक्षीने गौरव केला. हा गौरव त्यांनी कोणताही पक्ष भेद अथवा व्यक्ती भेद न ठेवता खुल्या दिल्याने केला, हे विशेष.! यंदाचा वाढदिवस विशाल परब यांना पुढील कार्यासाठी नक्कीच सकारात्मक ऊर्जा देऊन गेला, त्याहीपेक्षा सिंधुदुर्गच्या या भूमिपुत्राने युवकांच्या मनामध्ये वेगळ्या अशा निर्माण केल्या आणि विकासाच्या दृष्टिकोनातून झेपावणरं हे नेतृत्व युवकांच्या रोजगारासाठीही आगामी काळात नवनवीन संधी निर्माण करून देईल, अशा सहाजिकच नव्या आकांक्षा युवाईच्या मनात पल्लवीत करून गेला, हे सुद्धा तेवढेच सत्य आहे..!
हे फक्त ‘विशाल परबचं’ करू शकतात.! – उद्योग मंत्री उदय सामंतांची पावती
विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी झालेल्या कार्यक्रमात विद्यमान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि माजी आमदार राजन तेली हे राजकीय प्रतिस्पर्धी एकमेकांच्या शेजारी बसले होते. हाच संदर्भ घेऊन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, ”दीपकभाई केसरकर आणि राजन तेली आज एकमेकांच्या शेजारी बसले आहेत. ही किमया फक्त विशाल परब हेच साधू शकतात, दुसऱ्याचे ते काम नाही.!” हा एक प्रकारे हा विशाल परब यांच्या वैयक्तिक स्नेहसंबंधाचा परिपाक मानावा लागेल. खरोखरचं… एरवी एकमेकांचे राजकीय दृष्ट्या व इतरही अनेक बाबतीत अंतर्गत विरोधक असणारे केवळ दीपक भाई आणि माजी आमदार राजन तेली हे दोनच व्यक्ति नव्हे तर अनेक राजकीय नेते व पदाधिकारी रविवारच्या कार्यक्रमाच्या वेळी एकत्र दिसलेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे हे चित्र यापूर्वी दुर्मिळ असेल कदाचित मात्र काल ‘याची देहा याची डोळा.!’ याची प्रचिती तमाम उपस्थितांनी घेतली आणि हे फक्त घडले ते एकाच व्यक्तीमुळे – विशाल प्रभाकर परब…!
युवकांचा हा नवा आयडॉल सातत्याने विकासाच्या दिशेने झेपावत राहो आणि त्यांच्या हातून याहीपेक्षा दर्जेदार आणि समाजाभिमुख कार्य होत राहो, हीच श्री देव पाटेकरांच्या चरणी प्रार्थना..!
श्री देव उपरलकर या उमद्या आणि जिंदादिल अशा ‘विशाल व्यक्तिमत्त्वाला’ उदंड, निरामय आयुष्य प्रदान करो, हीच मनोकामना…!
जिंदादिल व्यक्तिमत्वाचे धनी विशाल परब यांना टीम ‘महाराष्ट्र माझा’ कडून पुनश्च एकदा वाढदिवसाच्या हृदयपूर्वक शुभेच्छा..!
- प्रा. रूपेश पाटील,
- महाराष्ट्र माझा…







