‘खा…की’ ने छळलेला ‘सिद्धांत..!’ ; प्रा. रूपेश पाटील यांचा विशेष संपादकीय लेख.

316

सावंतवाडी : सावंतवाडी पोलीस ठाणेची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत शिस्त आणि काटेकोरपणे तेवढेच कर्तव्यदक्षपणे जबाबदारीने काम करणे, अशी असतानाच या पोलीस ठाण्यातील दोन जबाबदार अधिकारी एका लाच प्रकरणात गुन्हेगार म्हणून सापडतात. तेव्हा निश्चितच ही बाब ‘खाकी’साठी योग्य नाही. कारण
ज्या पोलीस प्रशासनावर सामान्य जनतेचा आजही प्रचंड विश्वास आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वांत मोठ्या पोलीसदलांपैकी एक असून ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध आहेत. असे असताना अचानक दोन जबाबदार युवा अधिकाऱ्यांना लाच घेण्याची आणि आपल्या कर्तव्य ‘सिद्धांता’पासून परावृत्त होण्याची दुर्बुद्धी सूचावी, हे निश्चितच पोलीस प्रशासनासाठी दुर्दैव म्हणावे लागेल.

विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणात ज्या फ्लॅट विक्री प्रकरणात एका बिल्डरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला जातो, तो सुद्धा एक ‘युवा बिल्डर’ आहे आणि सावंतवाडी शहरात अनेक वर्ष आपल्या प्रचंड मेहनतीने त्यांनी स्वतःचा एक वेगळा व्यावहारिक ‘सिद्धांत’ निर्माण केला आहे. अत्यंत कमी वयात यश मिळवलेला हा ‘सिद्धांत’ निश्चितच अनेकांच्या डोळ्यात खूपत असेल, यात शंका नाही. मात्र एखाद्या गोष्टीतील पूर्व आर्थिक वैमनस्यातून युवा उद्योजकाचा बळी घेण्यासाठी काही मुठभर लोकांनी षडयंत्र रचले आणि संबंधित उद्योजकावर गुन्हे दाखल केले असतीलही, मात्र त्या युवा उद्योजकाला न्यायालयीन बाब प्रविष्ट असताना, केवळ ‘खाकी’चा धाक दाखवून वेगवेगळ्या पद्धतीने ब्लॅकमेलिंग केले जात असेल, तर निश्चितच हे खाकीसाठी अशोभनीय आहे. विशेष म्हणजे ज्या बिल्डरवर गुन्हा दाखल झाला, त्याला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असून जामीन मिळाल्यानंतर देखील पुन्हा एकदा “वरिष्ठांचा आमच्यावर दबाव आहे, म्हणून आम्ही काय ते बघतो, तुम्ही फक्त आमची मागणी पूर्ण करा.!” असे वारंवार मोबाईलवर संभाषण करून आर्थिक मागणी पूर्ण करण्याचा तगादा लावून, संबंधित बिल्डरचा एकप्रकारे मानसिक, आर्थिक छळ करून त्याच्याकडून फक्त पैसे काढून घेणे एवढाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी आपला प्रपंच केलेला दिसतो. तशा प्रकारचे कॉल रेकॉर्ड आपल्याकडे उपलब्ध असल्याचे संबंधित संबंधित युवा बिल्डरने ‘महाराष्ट्र माझा’शी बोलताना सांगितले आहे.

या संपूर्ण प्रकरणात अजून एक बाब निश्चित मानावी लागेल, ती म्हणजे हे दोन्ही पोलीस अधिकारी स्वतःच्या बुद्धीने हे कार्य करीत होते की, यामागची एखाद्या ‘झारीतल्या शुक्राचार्या’ची ‘पॉवर’ त्यांना हे करायला भाग पाडत होती. कारण तशा प्रकारचे संभाषणही त्यांनी संबंधित बिल्डरशी केलेले समोर येत आहे. विशेष म्हणजे सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुरुवारी जो प्रसंग घडला त्या प्रसंगानंतर सावंतवाडी पोलीस ठाण्यातच अंतर्गत कलह असल्याचे, तसेच हेवेदावे असल्याचे आणि नको ते गैरप्रकार होत असल्याचेही समोर आले आहे. या प्रचंड गदारोळाकडे वरिष्ठांचे अक्षम्य दुर्लक्ष झालेले दिसते, हे देखील सत्य आहे.

बडी मछली आयी जाल में, ‘खाकी वर्दी’ अपने खयाल में..!

किती विचित्र बाब आहे की, ज्या युवा बिल्डरवर फसवणूक प्रकरण आपल्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले, त्या बिल्डरचा जामीन झाल्याबरोबर सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील त्यांचे अभिनंदन करतात. हाच खाकीचा एक फसलेला ‘सिद्धान्त’ अभ्यास करण्याजोगा आहे. आणि हे तेच ‘पाटील’ आहेत, जे आपले सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांना अटक झाल्याबरोबर यांचा अचानक रक्तदाब वाढतो आणि ते रुग्णालयात दाखल होतात. मात्र दोन दिवसाअगोदर याच पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील यांनी संबंधित बिल्डरला फोनवरून ”आमच्यावर दबाव आहे. तुम्ही काय ते लवकर आर्थिक भागवायचे बघा..!” असे सांगून मनातल्या मनात “अब बडी मछली आयी जाल में..!” अशी इच्छा बाळगून मनात आर्थिक लालसेची मनीषा आणि ती पूर्ण झाल्याचे अंतर्गत लड्डू फुटत असणारे पाटील मात्र तात्काळ ब्लडप्रेशरने त्रस्त होतात आणि आजही ते जिल्हा रुग्णालयात अॅडमिट आहेत.  खरंतर एखाद्या सुशिक्षित, सुसंस्कृत आणि आर्थिक दृष्ट्यासुद्धा प्रबळ असलेल्या युवा उद्योजकाची या पद्धतीने पोलीस प्रशासन छळवणूक करत असेल तर सामान्य गोरगरीब जनतेचे पोलीस प्रशासनाकडून असलेली आशा आणि न्यायाची अपेक्षा काय ती बाळगायची..?, आणि जर ती बाळगली तर त्यात गैर काय..?, मात्र मूठभर बदनाम ‘खाकी’मुळे संपूर्ण पोलीस प्रशासनाला याचे उत्तर द्यावे लागते. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. आगामी काळात संबंधित बिल्डर यांना न्यायालय कायद्यानुसार काय तो न्याय देईल, मात्र न्यायालयीन बाब असतानाच तडजोडीची भाषा वापरून वारंवार संबंधित बिल्डरला फोन करणे, आर्थिक गोष्टींची पूर्तता करण्यासाठी तगादा लावणे आणि ब्लॅकमेलिंग करणे हे निश्चित पोलीस प्रशासनाच्या अशा जबाबदार अधिकाऱ्यांना अजिबात शोभनीय नाही.

विशेष म्हणजे ज्याने संबंधित युवा बिल्डरकडून पैशांची मागणी केली तो बाजूला राहिला आणि यात सागर खंडागळे यांचा प्रथम बळी जाणार की काय?, असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणात सावंतवाडी पोलीस ठाण्यासमोरच असलेल्या एका छोट्याशा हॉटेलमध्ये वारंवार बोलावून त्या बिल्डरला “आपण तुम्हाला सर्व प्रकरणातून कसे सुखरूप सोडवू शकतो?”, यासंबंधीच्या तडजोडी केल्या जायच्या, असेही समोर आले आहे.

खरं म्हणजे रात्रंदिन जनसामान्य सेवेचा ध्यास घेतलेल्या, उपाशीपोटी आपली प्रामाणिक ड्युटी बजावणाऱ्या लाखो पोलीस बांधवांची मेहनत आणि त्यांचा प्रामाणिकपणा अशा मूठभर लाचखोर पोलीस अधिकाऱ्यांमुळे धुळीस मिळतो. खरंतर अशांना सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करणे गरजेचे आहे. मात्र कायद्याचा आधार घेऊन हे पुन्हा अर्ध्या पगारावर आणि त्यानंतर पुन्हा सुखरूप सेवेतही रुजू होतात, हे खऱ्या अर्थाने प्रामाणिक काम करणाऱ्या लोकांसाठीचे दुर्दैव म्हणावे लागेल. काही पोलीस बांधव बिचारे राबराब राबतात. सेवानिवृत्त होताना त्यांच्या सायकल किंवा दुचाकीवरून ते घरी जातात मात्र काही अधिकारी, पोलीस प्रशासनात काम करणारे कर्मचारी हे अल्पावधीत लाखो – करोडोची माया जमवतात. त्यांच्यासह त्यांच्या परिवाराच्या प्रत्येक सदस्याकडे लाखोंचे ॲपलसारखे महागडे फोन्स आणि चैनीच्या सर्व वस्तू ते उपभोगताना पहावयास मिळतात. मग संशोधनाचा विषय निर्माण होतो, अल्पावधीत हे श्रीमंत झालेच कसे?, निश्चितच त्यांनी आपल्या खाकीला गहाण ठेवून आणि आपल्या प्रामाणिकपणाचा सौदा करून एखादा ‘सिद्धांत’ गाळलेला असतो, छळलेला असतो अन् पिळलेला असतो. म्हणूनच ते अल्पावधीत श्रीमंतांच्या यादीत आणि समाजात मानाच्या पंक्तीत जाऊन बसतात.

असो..! खरं म्हणजे आता सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात सुशिक्षित आणि सुसंस्कृत आणि तेवढाच जागृत जिल्हा म्हणून परिचित आहे. आता गरज आहे ती येथील पोलीस प्रशासनाने वेळीच सावध होण्याची आणि असल्या बेजबाबदार आणि पिळवणूक करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना योग्य वळणावर आणण्याची… बघूया काय होतंय ते..? प्रशासनाला लवकर जाग यावी, एवढीचं माफक अपेक्षा, तमाम सिंधुदुर्गवासी करीत आहेत.

शेवटी देवाक काळजी…!

 

प्रा. रूपेश पाटील, महाराष्ट्र माझा….