शारदीय नवरात्रौत्सवाला उद्यापासून प्रारंभ ; कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात तयारी पूर्ण, ‘अशी’ असणार व्यवस्था.

50

कोल्हापूर : आदिशक्तीच्या शारदीय नवरात्रौत्सवाला उद्या रविवार (ता. १५) पासून सर्वत्र पारंपरिक उत्साहात प्रारंभ होणार आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई, भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरासह नवदुर्गा मंदिरातील तयारी पूर्ण झाली आहे. सलग दहा दिवस शहरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. अंबाबाई मंदिरात गेली पंधरा दिवस तयारी सुरू आहे. त्याची पाहणी काल जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केली. यावेळी काही सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी देवस्थान समिती सचिव सुशांत बनसोडे, तहसीलदार स्वप्निल रावडे, मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे, सुयश पाटील, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे सचिन जाधव, अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे आदी उपस्थित होते.

शिव प्रतिष्ठानतर्फे दुर्गामाता दौड –

श्री शिवप्रतिष्ठानच्यावतीने रविवार (ता. १५) पासून सकाळी सात वाजता सानेगुरुजी वसाहतीतील तुळजाभवानी मंदिरापासून श्री दुर्गामाता दौड उपक्रमाला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर दररोज अनुक्रमे यादवनगर, मंगळवार पेठ, मुक्तसैनिक वसाहत, फुलेवाडी, उत्तरेश्वर पेठ, रविवार पेठ, पाचगाव, लक्षतीर्थ वसाहत, छत्रपती शिवाजी महाराज चौक आदी शहरातील विविध भागातून हा उपक्रम होणार आहे.

दृष्टिक्षेपात नवरात्रोत्सव…

  • अंबाबाई मंदिराकडे दर्शनाकरिता येणाऱ्या पुरुष व महिला भाविकांसाठी एकत्रितरित्या मुख्य दर्शन रांग ही भवानी मंडप येथून सुरु होऊन शेतकरी संघाच्या इमारतीमधून जुना राजवाडा पोलिस स्टेशन समोरील मंडपामधील रांगेतून पूर्व दरवाजातून मंदिरात जाईल आणि दर्शनानंतर भाविक उर्वरित तीन दरवाजांतून बाहेर पडतील.
  • विद्यापीठ हायस्कूल दरवाजाकडील वाहनतळाच्या समोर मोफत चप्पल स्टॅन्डची सुविधा असेल. भवानी मंडप येथे शेतकरी संघाच्या इमारतीसमोर तात्पुरते चप्पल स्टॅंड असेल.
  • बॅगा ठेवण्यासाठी पागा इमारत येथे लॉकर्सची सुविधा करण्यात आली आहे. अंबाबाई मंदिर परिसरामध्ये गणपती चौक येथून व महाव्दार दरवाजा समोरील तात्पुरत्या जिन्यातून मुखदर्शनाची व्यवस्था केली आहे.
  • ललिता पंचमीच्या सोहळ्यासाठी १९ ऑक्टोबरला श्री अंबाबाईची पालखी श्री त्र्यंबोली मंदिराकडे जाणार आहे. २२ ऑक्टोबरला रात्री साडेनऊला देवीची नगरप्रदक्षिणा होईल. २४ ऑक्टोबरला देवीची पालखी सायंकाळी पाचला दसरा चौकातील शाही दसरा सोहळ्यासाठी जाणार आहे.
  • थेट दर्शनासाठी मंदिर परिसरात १२ बाय १० फुटाच्या कायमस्वरुपी चार स्क्रीन बसवल्या असून, शहरातील दहा ठिकाणी तात्पुरत्या एलईडी स्क्रीन उभारण्यात आल्या आहेत. दर्शन रांगेतही टीव्ही स्क्रीनवरून थेट दर्शन मिळणार आहे.
  • अंबाबाई मंदिरात दुपारी दीड ते सायंकाळी पाऊणेआठ या वेळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतील.
  • शिवाजी चौकात सोंगी भजन स्पर्धा –

    छत्रपती शिवाजी चौकातील शिवाजी चौक तरुण मंडळाच्यावतीने यंदाही सोंगी भजन स्पर्धेचे आयोजन केले आहे. रविवारी (ता.१५) सायंकाळी सहा वाजता उद्योजक बसवराज आजरी, उद्योजक आशिष अंगडी यांच्या उपस्थितीत स्पर्धेला प्रारंभ होईल. पहिल्या दिवशी बाल स्वामी समर्थ सोंगी भजनी मंडळ (शनिवार पेठ) या भजनी मंडळाचा कार्यक्रम होईल. सोमवारी (ता.१६) जगद्‌गुरु संगीत भजनी मंडळ (आणूर), मंगळवारी (ता.१७) राम कृष्ण हरी भजनी मंडळ (गडमुडशिंगी), बुधवारी (ता.१८) माऊली भजनी मंडळ (वाटंगी), गुरुवारी (ता.१९) विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ (बुजवडे), शुक्रवारी (ता.२०) श्री विठ्ठलपंथी भजनी मंडळ (दुर्गुळवाडी), शनिवारी (ता.२१) अवधूत चिंतन भजनी मंडळ (सोन्याची शिरोली), रविवारी (ता.२२) स्वामी समर्थ भजनी मंडळ (दौलतनगर), सोमवारी (ता.२३) सद्‌गुरू सोंगी भजनी मंडळ (कंदलगाव) ही भजने सादर होतील.

    राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे स्वच्छता –

    नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने अंबाबाई मंदिर परिसरामध्ये स्वच्छता अभियान झाले. शहराध्यक्ष आदिल फरास यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम झाला. माजी उपमहापौर सुनील पाटील, विनायक फाळके, सत्तार मुल्ला, संजय कुराडे, अच्युतराव साळोखे, भैय्या मोहिते, कुमार साळोखे, धनाजी यादव, सुहास सालोखे, मनोज लोट, अब्दुलहमीद मीरशिकारी, माजी नगरसेविका रेखाताई आवळे, जायदा मुजावर, पूजा साळोखे, रेहाना नागरकट्टी, बेनझीर नदाफ आदी उपस्थित होते.