कुंपणच ‘शेण’ खात असेल तर तक्रार करायची तरी कुठे…? – प्रा. रूपेश पाटील यांचा विशेष संपादकीय लेख.

427

गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील भ्रष्टाचारात ‘अव्वल’ क्रमांकावर असलेले ‘पोलीस प्रशासन’ आता दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर ‘दुसऱ्या’ क्रमांकावर असलेले ‘महसूल प्रशासन’ आता प्रथम क्रमांकावर भ्रष्टाचाराच्या बाबतीत असल्याचे सर्वेक्षणावरून निदर्शनास आले आहे.  ही पोलीस प्रशासनाच्या बाबतीत दिलासा देणारी बाब दोन आठवड्यांपूर्वीच जाहीर झाल्यानंतर काल अत्यंत संस्कारशील, शांत आणि संयमी असलेल्या, निसर्ग संपन्नतेने ओतप्रोत भरलेल्या, सृजनशील अशा सावंतवाडी नगरीत सावंतवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि अजून एक सहकारी हे लाच प्रकरणात गुन्हेगार म्हणून समोर आले आहेत. खरंतर प्रथम क्रमांकावर असलेले पोलीस प्रशासन आता भ्रष्टाचारात दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे पंधरा दिवसांपूर्वीच सर्वेक्षणात सिद्ध झाल्यानंतर सावंतवाडीची कालची घटना म्हणजे सामान्य जनतेला हादरवून सोडणारी घटना आहे.

सागर खंडागळे आणि सूरज पाटील या युवा आणि अभ्यासू समजल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांना लाच खाण्याची दुर्बुद्धी सुचली असेल तर ते नक्कीच सामान्य माणसाला अचंबित करणारे आहे. अल्पावधीतच सिंधुदुर्ग जिल्ह्यात या दोन्ही अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनात स्वतःच्या कार्यकर्तृत्वाला सिद्ध केले आहे, हे नाकारून चालणार नाही. मात्र ‘श्रीमंत’ होण्याचा ‘शॉर्टकट’ शोधण्याच्या नादात यापूर्वीही अनेक हुशार आणि अभ्यासू अधिकारी लाच प्रकरणात सापडले आहेत, हा इतिहास आहे.  खरंतर ज्या पोलीस प्रशासनावर सामान्य जनतेचा आजही प्रचंड विश्वास आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वांत मोठ्या पोलीसदलांपैकी एक असून ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध आहेत. असे असताना आणि नुकताच कोकणवासीयांचा श्वास असलेल्या गणेशोत्सव काळात सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस प्रशासनाने उत्कृष्ट कार्य केले. सावंतवाडी तालुक्यात तर कायदा आणि सुव्यवस्थेला अत्यंत काटेकोरपणे निभावण्याचे काम सावंतवाडी पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केली आहे.  जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या दमदार नेतृत्वाने पोलीस प्रशासन दिलासादायक काम करत असतानाच काल सावंतवाडीचे दोन युवा पोलीस अधिकारी लाच प्रकरणात सापडले आहेत. अनेक गोरगरीब आणि अडीअडचणीत असणारी जनता मोठ्या अपेक्षने न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे पाहतात. अनेक बडे पोलीस अधिकारी प्रामाणिक आणि निष्ठेने सेवाही देतात. मात्र मुठभर भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण ‘खाकी बदनाम होते’. म्हणूनच बऱ्याचदा समाजातून ”आता खाकी वर्दीवर विश्वास राहिलेला नाही..!” असा नकारात्मक सूर ऐकावयास मिळतो.

असो… कालच्या संपूर्ण प्रकरणात लाच लुचपत विभाग त्यांच्या पद्धतीने योग्य अशी कायदेशीर कारवाई करेलच. परंतु ज्या पद्धतीने दोन युवा आणि अभ्यासू अधिकारी लाच प्रकरणात सापडतात, हे खाकी वर्दीस निश्चितच शोभणारे नाही. ‘सागरच्या लाटेत सूरज वाहून गेला’ की ‘सूरजच्या प्रकाशात सागरचा गेम झाला?’, हे येणारा काळ ठरवेल. मात्र कालच्या सावंतवाडी पोलीस स्टेशनच्या दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या लाच प्रकरणामुळे जिल्ह्यात पोलीस प्रशासनाची लाज गेली, हे निश्चित.! असो, अशी दुर्बुद्धी कोणत्याही प्रशासनामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला सुचू नये. कारण लाच देणे आणि लाच घेणे दोन्हीही गोष्टी कायद्याच्या दृष्टीने गुन्हाच ठरतात. भविष्यात कालच्या दिवसाप्रमाणे दिवस पुन्हा येऊ नये, एवढीच माफक अपेक्षा बाळगूया आणि ‘लाचखोर अधिकाऱ्यांचा निषेध’ व्यक्त करत ‘प्रामाणिक’ सेवा देणाऱ्या ‘खाकी वर्दीला सॅल्यूट’ करूया…! तूर्तास एवढेच…!

जय हिंद..!

प्रा. रूपेश पाटील…