चिंताजनक – ‘ह्या’ गावात तब्बल पाच गावठी दारुचे अवैध अड्डे राजरोसपणे सुरू! ; युवा पिढी जातेय बरबादीकडे, पोलीस प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष? ; अवैध धंद्यांविरोधी युवा पत्रकार छेडणार आंदोलन.!

343

रोहा : रुपेश रटाटे

रोहा तालुक्यातील धाटाव ग्रामपंचायत ही अत्यंत संवेदनशील ग्रामपंचायत म्हणून ओळखले जाते.
महाराष्ट्रात यशवंत समृद्धी ग्रामपंचायत तसेच महात्मा गांधी तंटामुक्ती, आणि गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात नंबर वनचे मानकरी असलेल्या ग्रामपंचायत हद्दीत खुलेआम गावठी दारू विक्री केली जाते. ही परिस्थिती म्हणजे मिळवलेल्या नावलौकिकपणाला कलंक असून तसेच ग्रामस्थांच्या नाकर्तेपणाचे लक्षण आहे का? असा संतप्त सवाल यानिमित्ताने देखील उपस्थित होतोय.

पाच दशकांपूर्वी एक घोषवाक्य होते ‘धाटाव आणि गरीबी हटाव!’. औद्योगिक वसाहतीत आता बोटावर मोजण्या इतपत काही कंपन्या चालू आहेत. त्यातच शहरी ग्रामीण भागातील तरुण आठ ते बारा तास ठेकेदारीत काम करताहेत. या कामात थकवा दूर करण्यासाठी स्वस्त मिळणारी दारु पिणे हा पर्याय मूळीच असू शकत नाही. परंतु परिसरात गावठी दारुची खुलेआम विक्री चालू असल्याने येथे येणारी तरुण पिढी दारूकडे वळाली असल्याचे दिसून येते.
या अवैध दारु विक्रीचा सुळसुळाट धाटाव परिसरात झाला आहे हे नेमके कोणाच्या आशीर्वादाने चालू आहेत?, असा सवाल येथील सुजाण रहिवासी करीत आहेत.
गावठी अवैध दारू विक्रीमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून, मोठ्या  प्रमाणात युवा वर्ग गुन्हेगारीकडे वळत आहेत. त्यातच अपघाताचे प्रमाण सद्या वाढले आहे. त्याचे कारण सुद्धा दारू पिऊन घडलेल्या अपघाती नोंदी आहेत.
मग असे कमविलेले पैसे दारुच्या आहारी गेला तर पूर्वीचे घोषवाक्य सत्यात येण्याऐवजी नाशाचे कारण ठरेल, तरी या सर्व परिस्थितीचा विचार करता रोहा तालुक्यातील रायगड जिल्हा डिजीटल मिडीया प्रसिद्धी प्रमुख रुपेश उमाजी रटाटे  यांच्या पुढाकाराने व युवा पत्रकार संघटनेच्या समर्थनाने रोहा पोळीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्याशी चर्चा करुन शनिवार दिनांक १४/१०/२०२३ रोजी रोहा पोळीस ठाणे अंमलदार सौ. पाशिलकर मॅडम व गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी श्री. पेरवी साहेब यांच्या उपस्थितीत धाटाव परिसरातील पाच अवैध दारु विक्रिचे धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत, असे निवेदन दिले आहे.
यावेळी रायगड स्वाभिमानचे संपादक रघुनाथ कडू, महाराष्ट्र लोकशाही न्यूज पोर्टलचे संपादक राकेश येलकर, झी २४ मराठी न्यूज वेबसाईटचे सहसंपादक किरणभाई मोरे तसेच पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र मोरे आदि उपस्थित होते.
या निवेदनामध्ये अवैध गावठी दारू विक्री धंदे बंद न केल्यास संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या पत्राद्वारे देण्यात आला. या पत्राची दखल रोहा पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर गांभीर्याने घेणार का.? असा सवाल देखील उपस्थित होतोय.? का त्या आधी धाटाव ग्रामस्थ एकजूट होऊन या विरोधी पाऊले उचलणार?, हे काळात निश्चितच समजेल.