वाचक मित्रहो, काल सहज जुनी पत्रे पहात होतो. त्यामध्ये आमच्या फार पूर्वीच्या, अत्यंत सज्जन व आम्हाला नेहमीच वंदनीय राहिलेल्या प्राचार्य प.ब भंडारी यांनी मला पाठविलेले एक पत्र सापडले. त्या पत्रात एक वाक्य होते ” प्रतिक्षा हा एक संस्कार आहे.” आणि तुमच्याकडे तो संस्कार आहे.मी पीएच.डी. प्रबंध सादर केल्यानंतर , ही पदवी मिळायला दोन वर्षाचा अवधी लागला होता. आणि ही पदवी मिळाल्यानंतर त्यांनी पाठविलेल्या अभिनंदन पर पत्रात हा उल्लेख होता. मला त्यावेळी या वाक्याचा अर्थ फारसा समजला नव्हता. परंतु पुढे माझ्या ही पीएच.डी.च्या दोन विद्यार्थ्यांना असाच पदवी मिळायला खूप उशीर झाला होता.
विद्यार्थ्यांचा हा काळ अत्यंत अस्वस्थतेचा असतो. या अस्वस्थेतून विद्यार्थी काही आड मार्गाने पदवी प्राप्त करण्याचा प्रयत्न करू शकतात. किंवा खूपच निराश होतात व त्याचा परिणाम त्यांच्या दैनंदिन कामावर अत्यंत प्रतिकूल होऊ शकतो. परंतु माझ्या विद्यार्थ्यांनी असा कोणताही प्रयत्न केला नाही. हा त्यांचा समंजसपणा असे मी मानत होतो. त्यांनी तसे न करण्याचे कारण त्यांचे वर जे संस्कार झालेले होते त्यामध्ये प्रतिक्षा संस्कार झालेला होता , असे आता वाटते.
एखादी गोष्ट आपल्याला मिळाविशी वाटते परंतु काही कारणाने त्यासाठी काहीवेळा खूप वेळ लागतो. अशावेळी व्यक्ती एक तर ती मिळविण्यासाठी चुकीचे मार्ग निवडते तर काही वेळा नैराश्यात जाते. व अगदी आत्मघातासारखा देखील मार्ग निवडते. परीक्षेतील यश, पैसा, एखाद्या हाती घेतलेल्या कामातील यश, एखादे पद, एखाद्याचे प्रेम, एखाद्याचे न जमणारे लग्न, या आणि कितीतरी गोष्टी अशा असतात की, ज्या मिळायला काहीवेळा अनपेक्षितपणे व सकृतदर्शनी विनाकारण उशीर होतो. आणि हा प्रतिक्षेचा काळ खूप कठीण असतो. आणि मग या काळात कोणताही आततायी मार्ग न अवलंबता आपले दुःख पचवून दैनंदिन कामामध्ये कोणताही व्यत्यय न येऊ देणे व संयम बाळगून अपेक्षिताची वाट पहात राहणे हाच तो प्रतिक्षा संस्कार होय. अलिकडे नवीन पिढी कडे या संस्काराची कमी आहे असे वाटते. प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तेव्हा मिळायला हवी अशी बहुतेकांची धारणा झालेली दिसते. म्हणूनच पालकांनी आपल्या पाल्याला हा संस्कार दिला पाहिजे. कोणतीही गोष्ट मागितली की द्यायची, पाल्याच्या मनाप्रमाणे व कलाप्रमाणे प्रत्येक वेळी पालकांनी वागायचे अशामुळे त्यांना असे वाटू लागते की, आपण मागितले की आपल्याला मिळणारच, किंवा मिळायलाच हवे, आपण म्हणू तसे घडणारच !
पण प्रत्येक वेळी असे होत नसते. काहीवेळा कोणतेही तार्किक कारण दिसत नसताना देखील उशीर होवू शकतो. हे त्यांना वारंवार पटवून द्यायला हवे. कोणतीही गोष्ट आपल्या मनाप्रमाणे हवीतशी व हवी तेंव्हा घडत नसते. त्यासाठी प्रतिक्षा करायला हवी…!
डॉ. ह.ना. जगताप





