मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज पुन्हा एकदा सुनावणी नियोजित केली आहे. या सुनावणीला आज दुपारी सुरुवात झाली. विधानसभा अध्यक्षांकडून याचिका एकत्र करण्यावर सुनावणी सुरु झाली. यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, आमदार अजय चौधरी आणि शिवसेना ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत विधानभवनात उपस्थित आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून केवळ त्यांचे वकील उपस्थित आहेत. कोणताही बडा नेता उपस्थित नाही.
यापूर्वी राहुल नार्वेकर यांनी 13 ऑक्टोबरला होणारी सुनावणी अलीकडे घेत 12 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजता घेतली. सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीमुळे विधासभा अध्यक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला.
आमदार अपात्रता सुनावणीचे ‘असं’ आहे वेळापत्रक –
- आमदार अपात्रतेच्या संदर्भात 12 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान युक्तिवाद होणार आहे.
- 23 नोव्हेंबर नंतर दोन आठवड्यात अंतिम सुनावणी होणार आहे.
- सर्व याचिकांची सुनावणी एकत्र घ्या या ठाकरे गटाच्या मागणीवर उद्या सुनावणी होणार
- आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जाणूनबुजून वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने एक याचिका दाखल करण्यात आली आहे.
- राहुल नार्वकरांच्या भूमिकेवर ठाकरे गटाकडून जोरदार टीका केली जात आहे.





