कुडाळ : ब्रेक फेल झाल्यामुळे वालावल येथे तीव्र उतारावर भोगवे-कुडाळ एसटी बसला अपघात झाला. ही घटना काल सकाळच्या सुमारास घडली. दरम्यान चालकाने प्रसंगावधान दाखवत एसटी रस्त्याच्या कडेला घळणीवर आदळल्याने मोठा अनर्थ टळला. यात सुदैवाने चालकासह ८ प्रवासी किरकोळ जखमी झाले. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
घटनेची अधिक माहिती अशी की, संबंधित एसटी बस भोगवे येथून कुडाळच्या दिशेने जात होती. यावेळी वालावल येथे एका तीव्र उतारावर एसटीचे ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. यावेळी त्याने प्रसंगावधान दाखवत एसटी रस्त्याच्या कडेला घळणीवर आदळली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातात सुदैवाने नऊ जण किरकोळ जखमी झाले. मात्र एसटीच्या समोरील भागाचा पूर्णतः चक्काचूर झाला आहे. तर याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.





