हैदराबाद : वर्ल्डकपच्या इतिहासातील पाकिस्तानचा सर्वांत मोठा विजय मिळवला आहे. क्रिकेट वर्ल्डकपला प्रारंभ झाल्यापासून विक्रमांवर विक्रम रचले जात आहेत. स्पर्धेला सुरुवात होऊन एक आठवडा झाला नसतानाही गेल्या 48 वर्षांमधील विक्रम एक आठवडाभरात मोडीत निघाले आहेत. आज श्रीलंका विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात चार शतके या सामन्यामध्ये नोंदवली गेली. त्यामुळे आजवरच्या वर्ल्डकपच्या इतिहासातील चार वैयक्तिक शतके नोंदवणारा सामना ठरला आहे. क्रिकेटचा इतिहासातील हा मोठा विक्रम आहे. वर्ल्डकपमध्ये आजपर्यंत झालेल्या कोणत्याही सामन्यामध्ये चार वैयक्तिक शतके नोंदवली गेली नव्हती. त्यामुळे हा एक रेकॉर्ड ब्रेक वर्ल्ड कप ठरत आहे.

पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका संघात स्पर्धेतील 8 वा सामना खेळला गेला. या सामन्यात मोठी धावसंख्या पहायला मिळाली. श्रीलंका संघासाठी कुसल मेंडीस व सदिरा समरविक्रमा यांनी शतके ठोकत 344 धावा उभारल्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानसाठी अब्दुला शफिक व मोहम्मद रिझवान यांनी शतके झळकावत पाकिस्तानला ही विक्रमी धावसंख्या गाठून दिली. पाकिस्तानचा हा स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला.





