देवगड : कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे आणि त्यांचे खासगी सुरक्षा रक्षक आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्याकडून आमच्या जीवास धोका असल्याची लेखी तक्रार युवासेना देवगड तालुकाप्रमुख गणेश गावकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.
यावेळी आम. वैभव नाईक, तालुका प्रमुख जयेश नर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उबाठा सेना नेते सतीश सावंत, कन्हैया पारकर व अन्य उपस्थित होते.
या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आपण पदाधिकारी असून देवगड ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी रिक्त पदांच्या भरतीसाठी पाठपुरावा करत आहोत. सोमवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२३ रोजी आम्ही जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्या बैठकीदरम्यान देवगड ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी भेट घेण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी स्थानिक आमदार नितेश राणे व त्यांचे खासगी सुरक्षा रक्षक तसेच काही गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते यांनी अपहरण करण्याचा प्रयत्न केला. तसेच आमदार नितेश राणे यांनी माझा हात पकडून मला जबरस्तीने इतर ठिकाणी न्यायचा प्रयत्न करत होते. त्यावेळी स्थानिक देवगड पोलीस निरीक्षक हे मात्र बघ्याची भूमिका घेताना दिसत असून पक्षपाती कारवाई करताना दिसून येत आहेत. सदर घटना संपूर्ण प्रसार माध्यमातून निदर्शनास येत आहे. तरी या गैरअर्जदार इसमांकडून आमच्या जीवितासचे बाबतीत दखलपात्र घटना घडण्याची तसेच मारहाण करण्याची शक्यता आहे. तरी आपण स्वतः याची दखल घेऊन आम. नितेश राणे आणि त्यांचे खासगी सुरक्षा यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.





