धाटाव – कोकणचं एक नयनरम्य अन् मनभावक गाव.! – रूपेश रटाटे. ; जावं कोकण, अनुभवावं संस्कृती दर्शन.!

471

कोकण…!
निसर्ग देवतेला पडलेले एक सुंदर स्वप्न..!
कोकणचं वैशिष्ट्य अनेक बाबतीत इतर ठिकाणांपेक्षा वेगळं आहे.
कोकणात निसर्ग जेवढा खुललेला आणि फुललेला आहे, तेवढेच येथील गावागावातील संस्कृती आणि परंपरा देखील वैविध्यपूर्ण आहेत.
सह्याद्रीच्या अलौकिक सौंदर्याने नटलेला,
आकाशाने कवेत घेतलेला,
निळ्याशार समुद्राने वेढलेला,
आणि साक्षात देवादिकांनी वास्तव्य केलेला.,
असा आमचा दैवी प्रांत – कोकण…!
या कोकणातीलचं एक नितांत सुंदर असं माझं गाव…
धाटाव..!

अगदी शालेय जीवनापासून गाव म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते गावकडची सुंदर कौलारू घरे. हे पाहिल्यानंतर मनात रुजून असलेल्या सुंदर आठवणी डोळयांसमोर जणू तरंगूच लागतात. माझं कोकणातील गाव ही असचं आहे. म्हणजेचं माझं धाटाव.

अखिल हिंदुस्थानचे दैवत…बहुजनप्रतिपालक…श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या,  रायगडाच्या कुशीत, कुंडलिकेच्या तीरावर वसेलेलं, रोहा तालुक्यातील निसर्गाच्या सानिध्यात असलेलं एक सुंदर गाव.., म्हणजे माझं धाटाव.!

मित्रांनो.., आपण स्वर्ग पाहिला नाही, परंतु निसर्गाची काही जिवंत दृश्य पाहिल्यानंतर याहून दुसरा स्वर्ग तो काय असावा..? असं मात्र नक्कीच वाटेल.

सुरूवातीला गावाच्या मुख्य रस्त्यातून आत शिरताना औद्योगिक क्षेत्राचा मोठा परिसर दिसून येतो. दूरवर पसरलेल्या रस्त्यावर दुतर्फा झाडे आणि गावापासून एक किलो मिटरच्या अंतरावर बारामाही वाहणारी संथ कुंडकीला नदी.  जी आपल्या डोळ्यांना एक वेगळीच भुरळ पाडते.

साधारणत: ५०० ते ६०० लोकवस्तीचं माझं धाटाव एक सुंदर गाव. त्यामुळे रस्त्यावर रहदारी जास्त पहायला मिळते. नदीच्या दोन्ही बाजूला काही अंतर ठेवून वस्त्या होत्या. आता तोडून त्या ठिकाणी भल्या मोठ्या वसाहती उभ्या झालेल्या दिसून येतात. गावाचं नाव तसं पाहिलं तर महाराष्ट्राच्या नवनवीन योजनेमध्ये अव्वल क्रमांकाने नामांकित केलेले, तेही कायमचं..!

माझं धाटाव..!

ग्राम स्वच्छता अभियान, घण कचरा विलगीकरण, पाणी पुरवठा योजना, अश्या एक ना अनेक शासकीय योजनेचे पुरस्कार माझ्या गावास प्राप्त झाले आहेत. कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात देखील वेगळीच छाप उमटवलेली दिसून येते. पुढे जाऊन पाहिले तर दर वर्षी गावाच्या उत्सवात धार्मिक कार्यक्रमात सगळेच ग्रामस्थ समरस झालेले असतात.
गावातील मुख्य चावडीवर विठ्ठल रुक्माई देवाचं सुंदर पुरातन मंदिर होते, परंतु ते मोडून त्या ठिकाणी प्रशस्त भलं मोठं मंदिर बांधलेले आहे, हे दिसून येते.

ग्रामदेवतेचे मंदिर म्हणजे जणू काय या गावाचा गाभाराच.! ते म्हणजे प्रत्येकाच्या हृदयातील श्रद्धास्थान असलेल श्री. सोनार सिद्ध महाराजांचं मंदिर.!, त्या शेजारी दिसून येत ते भलं मोठं तलाव… हा तलाव तर येणाऱ्या प्रत्येकाचं मन आकर्षित करतो. अनेक पारंपरिक सण, उत्सव साजरे करण्यासाठी अक्खा गाव इथे या देवळाच्या जागेत जमत असतो.

नवरात्र उत्सवात तर या ग्रामदेवतेच्या मंदिरात भक्तांची एकच मांदियाळी पाहायला मिळते. दसरा – दिवाळी आणि शिमगोत्सवात या जागेवर अनेक धार्मिक सोहळे होतात. तेव्हा सगळा गाव एकत्र होतो. गणपती, शिमगा म्हणजे मोठे सण. गणपतीतले जाखड़ी नृत्य, शिमग्यातील गोमुचा नाच, नमन किंवा कोकणचा बाळ्या नाच.!, अश्या बहुतेक परंपरा अजूनही या गावात टिकून आहेत.

गावात अनके डौलदार मंदिरे सुद्धा आहेत. त्यात शंकराच मंदिर, हनुमानाताचे मंदिर, विठ्ठल – रुक्माई मंदिर, सोनार सिद्ध महाराजांचं मंदिर, चेरोबा मंदिर , वेताळ महाराज , बुद्ध विहार आणि चौफेर पसरलेली निर्गाची जणू हिरवी शाल प्रत्येकालाच आकर्षित करते. असं हे समृद्धीने नटलेले सुंदर गाव.!

आता उशीर नको …!

येवा … कोकण आपलाच आसा..!

येवा .. धाटाव , एकदा तरी पहावा ..!

  • रूपेश रटाटे.