मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची नितांत आवश्यकता मान्य करतानाच अजित पवार गट महामंडळांसाठी तर शिंदे गट पालकमंत्रिपदांसाठी आग्रही आहे. सहकारी आमदारांना दिलेल्या शब्दानुसार मंत्रिपद देणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला सांगितल्याचे समजते.
रायगड, नाशिक या दोन जिल्ह्यांची पालकमंत्रिपदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कमालीची प्रतिष्ठेची केली असून अजित पवारांना त्यांच्या समर्थकांसाठी महामंडळे हवी आहेत. अंतर्गत सत्तासंघर्षाचा अन् सरकारच्या कारभाराचा फटका बसू नये यासाठी आम्ही म्हणू ती महामंडळे द्या, अशी नवी मागणी अजित पवार गटाकडून पुढे आली आहे.
महाराष्ट्रात सतत पुढे येणारे नवे प्रश्न हाताळणे, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासमोरचे आव्हान ठरले आहे. चार राज्यांच्या विधानसभांच्या तिकीटवाटपाचे आव्हान भाजपसमोर असतानाच महाराष्ट्रात नवरात्रीच्या सुमारास विस्तार करता येईल का, ही शक्यता तपासून पाहिली जाते आहे.
नक्षलवादविरोधी बैठकीसाठी दिल्लीत गेलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करतील, अशी शक्यता आहे. भाजपने लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सध्या मित्र पक्षांना सामावून घेत त्यागाचे धोरण स्वीकारले असले तरी कार्यकर्त्यांना कुठवर नाराज करायचे, असा प्रश्नही त्यांच्यासमोर आहे. भाजप , शिवसेनेचा शिंदे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाला विस्तार हवा असला तो करताना सर्वांना कसे सामावून घेतले जाईल, यावर विचार करावा लागणार आहे.





