सावंतवाडी : तालुक्यातील कोलगाव येथील गांजा पार्टी प्रकरणातील मुख्य म्होरक्या हा कुडाळ येथील असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. ‘आबेज नाईक’ असे त्या सूत्रदाराचे नाव आहे. त्याच्यासह आणखी ४ जणांना लवकरच ताब्यात घेऊ, अशी माहिती सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली.
तपासादरम्यान उघड झालेल्या नावात दीपेश धुरी (रा.कोलगाव, सावंतवाडी), रघुवीर सावंत (रा. सासोली-डोंगरपाल दोडामार्ग), रोहित गावडे (रा. चौकुळ, सावंतवाडी), तेजस वराडकर (रा. इन्सुली-बांदा) आदी नावांचा समावेश आहे. त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक गेले होते. परंतु त्यातील तिघे फरार झाले आहेत. त्यांचा तपास सुरू आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. कोलगाव येथे गांजा पार्टी केल्याप्रकरणी सावंतवाडी सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कॅजिटन पिंटो आणि सौरभ कदम या दोघांना कोलगाव येथे ताब्यात घेतले होते तर त्यानंतर डमी गिऱ्हाईक पाठवून कुडाळ येथे गांजा विकताना राहुल राठोड याला ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत या
चौघांची नावे उघड झाली होती. त्यांना ताब्यात घेण्यासाठी पथक त्यांच्या घरी पोहोचले. परंतु तत्पूर्वी ते फरारी झाल्याचे समजते.. त्यामुळे संबंधित संशयिताच्या नातेवाईकांना हजर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत मुख्य सूत्रधार असलेल्या तपासात उघड झाले. त्यांच्यावर यापूर्वीही गांजा विक्री केल्याचा व बाळगल्याचे गुन्हा दाखल आहे, तो सराईत आहे. त्यामुळे त्याला लवकरच ताब्यात घेऊ, असा विश्वास श्री. अधिकारी यांनी व्यक्त केला.
दुसरीकडे पोलिसांच्या या बेधडक कारवाईमुळे गांजासह अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळक्याचे धाबे दणाणले आहेत तर आणखी काहींना या प्रकरणी अटक करू, त्या दृष्टीने आमचा तपास सुरू आहे, असा इशारा पी. आय. ऋषिकेश अधिकारी यांनी दिला आहे





