देवगड : देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये तीन वैद्यकीय अधिकारी असून ते योग्य प्रकारे रुग्ण सेवा देत आहेत, तसेच चार अधिपरिचारीका ही देण्यात आल्या आहेत. देवगड ग्रामीण रुग्णालयाची रुग्णसेवा चालवण्यासाठी पुरेशा प्रमाणात स्टाफ आता उपलब्ध झाला असून उर्वरित पदे भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.

आमदार नितेश राणे यांनी केलेल्या सूचनेनुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी आज देवगड ग्रामीण रुग्णालयात तातडीने भेट दिली. रुग्णालयात असलेली यंत्रसामग्री औषधे रुग्णसेवा व स्टाफ याचा पूर्णतः आढावा घेतला.
वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विटकर यांना समज –
कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्वसूचना दिल्याशिवाय देवगड ग्रामीण रुग्णालयाचे आपले कार्यक्षेत्र सोडू नये, अशा शब्दात देवगड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विटकर यांना समज देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली आहे. यापुढे असा प्रकार झाल्यास नोटीस बजावण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये दोन M.B.B.S अधिकारी –
देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये आयुष्य योजनेतून डॉ. संजय विटकर व डॉ. अर्चना राजपूत या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक असल्याचे डॉ. श्रीपाद पाटील यांनी सांगितले. देवगड रुग्णालयामध्ये सर्वात जास्त गरज गरोदरपणातील सेवा देणे ही आहे. यामुळे हे पद स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून डॉ. रघुनाथ जोशी यांच्याकडे आहे. तसेच डॉ. अर्चना राजपूत या देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये सेवा देत आहेत. याशिवाय होमिओपॅथी व आयुर्वेदिकमधील वैद्यकीय तज्ज्ञ देवगड ग्रामीण रुग्णालयात असून कोणत्याही प्रकारे सेवा कमी होणार नाही, याची आपण काळजी घेऊ. शासनाकडे या रिक्त पदाबाबत पाठपुरावा सुरू असून लवकरच उर्वरित दोन वैद्यकीय अधिकारीही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
देवगडच्या रुग्णसेवेवर आमदार नितेश राणे यांनी लक्ष दिले आहे. यामुळे यापूर्वीच रिक्त असलेल्या चार
अधिपरिचारीका आल्याने पूर्णता भरल्या आहेत. तसेच उर्वरित जागांसाठी आमदार नितेश राणे यांनी पाठपुरावा सुरू केला आहे.





