गांधी विचार म्हणजे जगाला भारताने दिलेली देणगी.! – डॉ. एस. पी. वेल्हाळ.

66
बांदा : सत्याग्रह हे गांधीजींच्या तत्वज्ञानाचे मूलभूत सूत्र आहे. त्यांच्या मते सत्य ही जीवन साधना आहे. सत्य हाच ईश्वर आहे. सत्याचे दर्शन अहिंसेशिवाय होऊ शकत नाही. गांधीजींनी सत्याला आत्मिक बळ व आध्यात्मिक हत्यार म्हटले आहे. ज्यांना मानवी जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणावयाचा असेल त्यांनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने वाटचाल करायला हवी.  ग्रामस्वराज्य, स्वयंपूर्ण खेडी, विश्वस्त, श्रमप्रतिष्ठा, अहिंसा असे अनेक विचार महात्मा गांधींनी जगाला दिले. गांधी हा एक वैश्विक विचार आहे. हा विचार मारून संपवता येत नसतो. गांधी विचार ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे असे प्रतिपादन डॉ. एस. पी. वेल्हाळ यांनी केले.
येथील गोगटे वाळके महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एस. पी. वेल्हाळ  होते.  व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. पी. वेल्हाळ, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी  प्रा. डॉ. किशोर म्हेत्री, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सदस्य प्रा. डॉ. एन. डी. कार्वेकर उपस्थित होते.  महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. कोट्यावधी गरीब व पदलितांचे उत्थान केले. लोकांमध्ये त्यागाची व सेवेची भावना रुजवली. त्यांनी न्याय, समता आणि शांततेसाठी लढा दिला. याप्रसंगी लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्याचा आढावा घेतला. देशाचे सरकार स्थापन झाल्यानंतर गृहमंत्री, रेल्वेमंत्री, वाहतूक आणि दळणवळण मंत्री तसेच वाणिज्य आणि उद्योग मंत्री म्हणून शास्त्री यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. देशाचे दुसरे पंतप्रधान म्हणून त्यांची कारकीर्द महत्त्वपूर्ण ठरली. त्यांनी ‘जय जवान जय किसान’ असा संदेश भारतीयांना दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर होते. महात्मा गांधींचे विचार अद्याप जिवंत आहेत. त्यांनी युद्धाची परिभाषा बदलली. अहिंसेच्या मार्गाने कुठलाही रक्तपात न करता लढाई जिंकता येते. अपरिग्रहाचे तत्व महात्मा गांधींनी सांगितले. वीस वर्षे दक्षिण आफ्रिकेत कार्य केले. शांततेच्या मार्गाने आपले हक्क मिळविता येतात हे त्यांनी जगाला दाखवून दिले. असे प्रतिपादन डॉ. गोविंद काजरेकर यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना केले. याप्रसंगी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. डॉ. किशोर म्हेत्री यांनी केले. प्रा. डॉ. एन. डी. कार्वेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. मिलन वालावलकर यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक व विद्यार्थी उपस्थित होते.