देवगड : तालुक्यातील हिंदळे गावची सुकन्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची पहिली ‘अग्नीवीर’ कु. रेणुका विलास राणे हिचे बंगळुरू येथील प्रशिक्षण यशस्विरीत्या पूर्ण झाले आहे. तिची भारतीय सैन्यात निवड झाली असून आसाम येथे नियुक्ती झालेली आहे. ही बाब हिंदळे गावाच्या आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची आहे. तिच्या या प्रचंड यशाचे गमक तिची अपार मेहनत, ग्रामदैवत श्री काळभैरव यांचे आशीर्वाद आणि तिच्या आई – वडिलांचे पाठबळ हेच आहे. कु. रेणुका हिचे अभिनंदन आणि कौतुक करावे तितके थोडेच आहे. तिला तिच्या पुढील वाटचालीसाठी समस्त हिंदळेग्रामस्थांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी रेणुकाचे वडील विलास राणे व आई सौ. राणे उपस्थित होते. तसेच सरपंच मकरंद शिंदे, पोलीस पाटील संदीप हिंदळेकर तसेच सर्व हिंदळे ग्रामस्थांनी तिच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्यात.





