कुडाळ : राजकारण आणि शिक्षकांचे प्रश्न हे दोन वेगळे विषय असून शिक्षकांचे प्रश्न माहीत असलेला कार्यकर्ता ते समजू शकतो आणि सोडवण्यासाठी लढू शकतो. त्यामुळे शिक्षकांनी संघटनात्मक हेवेदावे बाजूला सारून शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत शिक्षक भारतीचे कोकण विभागीय अध्यक्ष असलेल्या व शिक्षकांच्या समस्यासाठी अविरत झगडणाऱ्या धनाजी नानासाहेब पाटील यांनाच मतदान करावे असे आवाहन शिक्षक भारतीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी केले आहे.
इतरांना राजकारण करण्यासाठी विधान सभेमध्ये 288 जागा दिलेल्या आहेत. या व्यतिरिक्त आपल्या संविधानाने फक्त शिक्षकानाच स्वतःचा आमदार निवडण्याचा अधिकार दिला आहे. यापूर्वी विविध संघटनांचे प्रतिनिधी, ज्यांना शिक्षकांच्या समस्यांची जाणीव होती जे स्वतः संघटनेमध्ये कार्य करून शिक्षकांचा विश्वास प्राप्त करत होते तेच आमदार म्हणून विधानपरिषदेवर पाठवले जात होते. पण मागील काही निवडणुकामधून हे चित्र बदलताना दिसत असल्याची खंत संजय वेतूरेकर यांनी व्यक्त केली आहे.
आता संघटनांच्या जागी विविध राजकीय पक्ष आपले पक्षीय बलाबल वाढवण्यासाठी या मतदार संघाचा वापर करत आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे. या राजकीय इर्षेमुळे अनेक शैक्षणिक कायद्यांची पायमल्ली करून अनेक जाचक शासन निर्णय शिक्षकांवर लादले जात आहेत. या जाचकतेमुळे शिक्षण क्षेत्रामध्ये अस्थिरता व असुरक्षितता निर्माण झाली आहे.
शैक्षणिक चळवळीतून आलेले आमदार हे जरी विविध संघटनांचे प्रतिनिधी असले तरी शिक्षकांच्या प्रश्नासाठी ते एक होऊन विधान परिषदेमध्ये आवाज उठवतात. आज मात्र राजकीय इच्छाशक्ती पुढे शिक्षक संघटना लुप्त चालल्या आहेत.
दरम्यान शिक्षकांचा प्रखर विरोध असलेले नवीन पेन्शन योजना, 20 व 40 टक्के टप्पा अनुदानावर पाच ते 10 वर्ष काम करणारे शिक्षक,विनाअनुदानित शिक्षक म्हणून काम करून एक ही रुपया वेतन न घेता सेवानिवृत्त होणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , अनेक वर्षे शिक्षक भरती नाही त्यामुळे अनेक शाळांमध्ये प्रत्येक विषयासाठी विषय शिक्षक नसणे,शाळेला मुख्याध्यापक नाही यासारख्या गंभीर समस्या शिक्षण क्षेत्राला पर्यायाने शिक्षकांना ग्रासले आहे.
शिक्षकांच्या प्रश्नाबाबत सत्ताधारी व विरोधक एखाद्या विषयावर एकमत देत असतील तर त्या विषयाला पूर्णत्वास नेण्यासाठी संघटनांत्मक बळ वाढवण आवश्यक असते.छत्तीसगढ, राजस्थान,.हिमाचल प्रदेश, पंजाब, झारखंड यासारख्या राज्यात जुनी पेन्शन लागू होते. मात्र केंद्र सरकार प्रमाणे महाराष्ट्र सरकार नेही जुनी पेन्शन नाकारली आहे. या विषयावर आवाज उठविण्यासाठी म्हणूनच संघटनामध्ये असणारे हेवेदावे बाजूला सारून संघटनांचे प्रतिनिधी म्हणून
कोकण शिक्षक मतदार संघातून शिक्षक आमदारकीची निवडणूक लढवणारे शिक्षक भारतीचे उमेदवार धनाजी नानासाहेब पाटील यांना पहिल्या पसंतीचे मतदान करून विजयी करावे असे आवाहन शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील व जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी केले आहे.





