भारताकडून लंका दहन..!, अवघ्या २१.३ षटकात खेळ खल्लास! ; आशिया चषकावर कब्जा.!

78

कोलंबो : आशियाई क्रिकेटमधील सर्वात मानाची क्रिकेट स्पर्धा असलेल्या आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (17 सप्टेंबर) खेळला गेला. भारतीय गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करताना श्रीलंकेचा डाव केवळ 50 धावांवर संपवला होता. या धावांचा पाठलाग करताना भारताने एकही गडी न गमावता दहा गडी राखून विजय मिळवला. यासह भारताने आठव्यांदा आशिया चषक आपल्या नावे केला.

आशिया कप 2023 मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात काटें की टक्कर होईल असं वाटत होतं. श्रीलंकेत श्रीलंकेला आव्हान देणं तितकं सोपं नसतं. हे आपल्याला आशिया कपच्या सुपर 4 सामन्यातच पहावयास मिळालं होतं.

मात्र आजचा आशिया कपचा फायनल सामना खूपच वेगळा ठरला. नाणेफेक झाल्यानंतर पाऊस आल्याने सामना आता किती रेंगाळणार अशी भावना निर्माण झाली होती. मात्र वरूणराजाचं आव्हान टीम इंडियानं स्विकारलं अन् प्रत्येकी 50 षटकांचा सामना अवघ्या 21.3 षटकात संपवला.

वनडे क्रिकेट इतिहासातील हा तिसऱ्या क्रमांकाच सर्वात कमी काळ (चेंडूच्या बाबतीत) चाललेला सामना ठरला. यापूर्वी 2020 मध्ये नेपाळ आणि अमेरिका यांच्यातील वनडे सामना 104 चेंडूत संपला होता. तर 2001 मध्ये श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामना 120 चेंडूत संपला. आजचा भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना 129 चेंडूत संपला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेला जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात पहिला धक्का दिला. यानंतर चौथ्या षटकात मोहम्मद सिराजने धमाकाच केला. त्याने चौथ्या षटकात 4 विकेट्स घेत लंकेची अवस्था 5 बाद 12 धावा अशी केली.

यानंतर श्रीलंका डाव सावरेल असे वाटत होते. मात्र भारतीय वेगवान गोलंदाजांनी टिच्चून मारा करत लंकेच्या फलंदाजांना जखडून ठेवले. मोहम्मद सिराजने कर्णधार शानकाचा शुन्यावर त्रिफळा उडवत आपला पाचवा बळी टिपला. त्यानंतर 17 धावा करत एक बाजू लावून धरलेल्या कुसल मेंडीसला देखील बाद करत आपली सहावी शिकार केली.

श्रीलंकेची 7 बाद 33 धावा अशी अवस्था झाली असताना हार्दिक पांड्याने श्रीलंकेची शेपूट जास्त वळवळू दिली नाही. त्याने उरलेल्या तीन विकेट्स घेत लंकेचा डाव 15.3 षटकात 50 धावांवर संपवला. लंकेकडून मेंडिसने सर्वाधिक 17 तर दुशान हेमनथाने नाबाद 13 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही.