सांगोला : एकतर्फी प्रेमप्रकरणातून तरुणाने एका महाविद्यालयीन तरूणीचा धारदार हत्याराने सपासप वार करून निर्घृणपणे खून केल्याची घटना सांगोला तालुक्यात कोळा येथे घडली. ऋतुजा दादासाहेब मदने (वय १८, रा. ईराची वाडी, कोळा) असे खून झालेल्या तरूणीचे नाव आहे. तिच्या डोक्यावर, गळ्यावर, पाठीवर, मानेवर गंभीर वार झाले. ती रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडली. ही घटना शनिवारी रात्री उशिरा ईराचीवाडीत तिच्या घरासमोरच घडली. घटनेनंतर हल्लेखोर तरूणाने पलायन केले. याप्रकरणी मृत तरूणीचे मामा पांडुरंग दाजीराम सरगर (रा. कोळा) यांनी संशयित सचिन मारुती गडदे (रा. गौडवाडी, ता. सांगोला) याच्या विरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. त्यानुसार पोलिसांनी सचिन गडदे याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. मृत ऋतुजा ही रात्री घरात असताना सचिन हा तिच्या घरासमोर आला आणि त्याने तिला हाक मारून घराबाहेर बोलावले. ती घराबाहेर येताच काही क्षणातच सचिन याने काही कळण्याच्या अगोदरच तिच्यावर धारदार हत्याराने सपासप वार केले. या घटनेमुळे संपूर्ण सांगोला तालुका हादरला आहे.







