सावंतवाडी : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आणि जोधा रायका यांच्या मालकीच्या जय अंबे स्नॅक्स अँड डेअरी या दुकानाला आज पहाटे आग लागून सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले आहे.
सदर घटना आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास हॉटेल मॅगोच्या परिसरात घडली.
सदर घटना मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या महिलांच्या लक्षात वेळीच आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना फोन केला. त्यामुळे पालिकेच्या बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले. त्यामुळे बेकरीचे मोठे नुकसान झाले नाही. शॉर्टसर्किटने ही आग लागली असावी, अशी शक्यता त्यांचे भाऊ राणा रायका यांनी महाराष्ट्र माझा जवळ व्यक्त केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सावंतवाडी येथील मँगो हॉटेल परिसरात श्री. रायका यांचे जय अंबे स्नॅक्स अँड डेअरी हे दुकान आहे. नेहमीप्रमाणे त्यांचे भाऊ लादू हे रात्री दहाच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले होते. दरम्यान पहाटे चार वाजण्याची सुमारास तेथून मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या दोघा महिलांना दुकानाच्या आतून धूर येताना दिसला. त्यांनी याबाबतची माहिती १०० नंबर वरून पोलिसांना दिली. पोलिसांनी त्या ठिकाणी तात्काळ धाव घेतली. त्यानंतर पालिकेचा बंब घेऊन त्या ठिकाणी पालिकेचे कर्मचारी नंदू गावकर, आरोग्य निरीक्षक वैभव नाटेकर आदी दाखल झाले आणि त्यांनी पालिकेच्या अग्नि बंबच्या सहाय्याने आग विझवली. या आगीत रायका यांचे फ्रिज आतील साहित्य बिस्किट, फरसाण व अन्य विक्रीचे साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवाने वेळीच प्रकार लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला, असे रायका यांनी सांगितले.






