“जब तक सूरज चांद रहेगा, सुनील सावंत आपका नाम रहेगा..!” ; साश्रु नयनांनी शहीद सुभेदार सुनील सावंत यांना अखेरचा निरोप.!

308

सावंतवाडी : “जब तक सूरज चांद रहेगा, सुनील सावंत आपका नाम रहेगा..!”,
“अमर रहे, अमर रहे, सुभेदार सुनील सावंत अमर रहे!’,
“वंदे मातरम्..!, भारत माता की जय..!”
‘अमर रहे,  वीर जवान सुनील सावंत अमर रहे..!”
अशा हजारो घोषणांसह साश्रु नयनांनी, पंजाब येथे शहीद झालेले १९ मराठा बटालियनचे जेसीओ सुभेदार तथा कारीवडे गावचे वीर सुपुत्र सुनील राघोबा सावंत यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला.


महाराष्ट्र पोलीस व जवानांच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून आणि अंतिम बिगुल वाजवून शहीद सुनील सावंत यांना अखेरची मानवंदना दिली.
शहीद सुनील सावंत यांचे पार्थिव विमानातून शनिवारी सकाळी नियोजित वेळेपेक्षा तब्बल तीन तास उशिरा दिल्ली विमानतळावरून गोवा – मोपा विमानतळावर पोहोचले. त्यानंतर गोवा येथून दुपारी दोन वाजता त्यांचे पार्थिव बेळगाव भारतीय सैन्य दलाच्या एएलएस गाडीतून कारीवडे गावात दाखल झाले. त्यानंतर भैरववाडी शाळा ते शहीद सुनील सावंत यांच्या घरापर्यंत त्यांच्या अंतिम यात्रेस सुरुवात झाली.
त्यांचे पार्थिव घरी आणल्यानंतर मुलगी स्नेहल, मुलगा संज्योत, पत्नी सुप्रिया, वडील राघोबा यांच्यासह सावंत कुटुंबीयांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.
यावेळी उपस्थित सर्वांचे डोळे अक्षरशः पाणावले. त्यानंतर “शहीद सुभेदार सुनील सावंत अमर रहे, जब तक सूरज चांद रहेगा, सुनील सावंत आपका नाम रहेगा..!”
अशा भावपूर्ण घोषणांनी त्यांच्या अंतिम यात्रेस सुरुवात झाली.

या अंत्ययात्रेत महिलांसह शेकडो ग्रामस्थांचा सहभाग होता. यानिमित्त कारिवडे भैरववाडी शाळा, शहीद सुनील सावंत यांचे घर ते स्मशानभूमीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढून तसेच पताका लावून वीर जवान सुनील सावंत यांना भैरववाडीवासियांनी आगळीवेगळी श्रद्धांजली वाहिली.
शहीद सुभेदार सुनील सावंत यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सकाळपासूनच माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी, सर्व माजी सैनिक, महसूल व पोलीस प्रशासनाचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच कारीवडे परिसरातील सर्व महिला ग्रामस्थ येत होते.

यावेळी शहीद सुनील सावंत यांना भारतीय सैन्य दलाच्या बेळगाव येथील आर्मी, मराठा बटालियन, महसूल व पोलीस आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी आणि पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून अखेरची मानवंदना दिल्यानंतर शहीद  सावंत यांचे सुपुत्र संज्योत सावंत याने मुखाग्नी दिला आणि “सुनील सावंत अमर रहे..!” अशा घोषणांनी शहीद सुनील सावंत यांना अखेरचा निरोप देण्यात आला.