एस. टी. प्रशासनचे मनमानी धोरण, उद्रेक होण्यापूर्वी त्यांनी आपला कारभार सुधारावा : संतोष मोर्ये

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील घोटगेवाडी – मोर्ले – केर हे गाव लांब पल्ल्याचे आहे. येथे येण्या – जाण्यासाठी एस. टी. वाहतूक हाच पर्याय आहे. मात्र गेले काही माहिने एस. टी. प्रशासन मनमानी धोरण अवलंबत आहे. याचा परिणाम म्हणून शाळा, कॉलेजमध्ये येणारे विद्यार्थी ताटकळत तासनतास रस्त्यावर थांबतात. शिवाय कहर म्हणजे एस. टी. फेरी अचानक बंद करण्याचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे तिन्ही गावांचा उद्रेक होण्यापूर्वी एस. टी. प्रशासनाने आपला कारभार सुधारावा असा सल्ला मोर्ले गावचे उपसरपंच तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कोनाळ विभागप्रमुख संतोष मोर्ये यांनी दिला आहे.

मोर्ये पुढे म्हणाले, लोकप्रतिनिधी म्हणून जनतेचा रोष आम्हांला सहन करावा लागतो. दोडामार्ग तालुका ठिकाण असून त्या ठिकाणी संपर्कयंत्रणा नाही त्यामुळे सावंतवाडी येथील डेपोला कॉल करावे लागतात. पहिल्यांदा दोडामार्ग येथील डेपोचा संपर्क क्रमांक किंवा जबाबदार अधिकारी यांचा मोबाईल नं. जारी करावा. सदर ग्रामपंचायतीना एस. टी. बाबत गैरसोयी असल्या की कॉल करता मग एस. टी. फेरी येणार नाही हे कोण सांगणार? यापुढे तिन्ही गावातील फेऱ्या अचानक बंद करू नयेत आणि वेळापत्रका प्रमाणे फेऱ्या याव्यात. ड्रायव्हर आजारी पडला, एस. टी. च कमी आहेत अशी थातूर मातूर कारणे सांगू नयेत. ग्रामीण भागातील एस. टी. सेवा अखंड ठेवावी असेही मोर्ये म्हणाले.