विद्यार्थ्यांनी घेतली बाप्पाच्या मूर्तीच्या रंगकामाची अनुभूती.! ; विद्यामंदिर प्रशालेचा स्तुत्य उपक्रम.

35

कणकवली : येथील विद्यामंदिर हायस्कूलच्या पर्यावरण सेवा योजना या विभागामार्फत योजना प्रमुख प्रसाद राणे यांनी आज शनिवार प्रशालेतील पर्यावरण सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना व अन्य विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गणपती बाप्पा कशाप्रकारे तयार करावेत आणि ते रंगवून पूर्ण कसे करावेत? याबद्दल प्रात्यक्षिकासह माहिती दिली.

 

विद्यार्थ्यांनी प्रतीवर्षी आपल्या घरी गणपती बाप्पा पूर्णपणे तयार झालेले गणपती बाप्पा आणले जातात, हे पाहिलेलं असतं.  पण प्रत्यक्षात गणपतीची मूर्ती कशा प्रकारे घडवली जाते? हे माहिती नसतं. विद्यार्थ्यांना त्याची माहिती करून देण्यासाठी पर्यावरण पूरक मातीचा गणपती कसा तयार करावा?, तो पूर्णत्वास कसा आणावा? आणि त्यानंतर त्याच्यावर रंगकाम कसं करावं?, मग त्याच्यामध्ये पहिला पांढरा रंग त्यानंतर अंगाचा रंग, त्यानंतर शेला व धोतर यांचा रंग. त्याच्यानंतर त्याची शेडींग, त्याची लेखणी म्हणजे डोळ्याचं काम आणि सोनेरी काम म्हणजे मुकुट, ज्वेलरी हे सर्व रंगकामाचे टप्पे पूर्ण करून प्रत्यक्ष मूर्ती कशाप्रकारे तयार केली जाते, याचा अनुभव प्रात्यक्षिकासह मुलांनी आज प्रशालेमध्ये घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात गणपती बाप्पा कसे तयार होतात हे बघता आलं.

ह्या उपक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक पी. जे. कांबळे आणि पर्यवेक्षक सौ. तांबे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याचबरोबर या उपक्रमासाठी पृथ्वीराज बर्डे व NCC चे विद्यार्थी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी “आपल्या घरी यावर्षी पर्यावरण पूरक गणपती बाप्पाच आणणार..!” अशी प्रतिज्ञाही घेतली.