गो..गो..गोविंदा..!, कुठं ८ तर कुठं ९ थर..! ; मुंबई, ठाण्यात दहीहंडीचा थरार..!

40

मुंबई : आज मुंबई, ठाण्यात आज दहीहंडीचा चांगलाच उत्साह दिसून आला. मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने आज दमदार हजेरी लावल्याने गोविंदा पथकांचा उत्साह आणखीच शिगेला पोहचला. चाळीतील गल्लींपासून ते राजकीय पक्षांनी आयोजित केलेल्या लाखोंच्या कार्यक्रमात गोविंदांचा उत्साह ओसंडून वाहत होता. काही ठिकाणी आठ थर तर काही ठिकाणी 9 थर रचण्यात आले आहे. सायंकाळपर्यंत 10 थरांचा विक्रम रचला नव्हता. दरम्यान, दुपारी तीन वाजेपर्यंत मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात 35 जखमी गोविंदांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

मुंबई, ठाण्यात पारंपरीक आणि मोठ्या दहीहंडीचाही उत्साह दिसून आला. दादर येथील आयडियल बुक डेपोजवळ  महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रक मंडळाच्या माध्यमातून दहीहंडी साजरी करण्यात आली. या ठिकाणी पर्यावरण विषयावरील पथनाट्य सादर करण्यात आली. या ठिकाणी,  महिला, दिव्यांगांनी दहीहंडी साजरी केली.

35 गोविंदा जखमी, रुग्णालयात उपचार

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 35 जखमी गोविंदांची नोंद करण्यात आली. यापैकी 4 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, 9 जणांना डिस्चार्ज करण्यात आले. 22 जणांवर ओपीडीमध्ये उपचार करण्यात आले असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली. या आकडेवारीत खासगी रुग्णालयात उपचार करणाऱ्या गोविंदाचा समावेश नाही.

मुंबई, ठाण्यात राजकीय नेत्यांकडून दहीहंडीचे आयोजन

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई, ठाण्यात राजकीय नेत्यांची रेलचेल दिसून आली. वर्तक नगर येथे प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानने दहीहंडीचे आयोजन केले होते.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्यासह विविध कलाकारांनी उपस्थित राहत गोविंदा पथकाचा उत्साह वाढवला.