कणकवली : एकीकडे संपूर्ण राज्यात शिक्षक दिन उत्साहात साजरा होत असताना कणकवली येथे मात्र शिक्षक दिनीच शिक्षकांना उपोषण करावे लागले आहे. ‘विद्यार्थ्यांना शिकू द्या अन् शिक्षकांना शिकवू द्या..!’ अशी हाक देत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कणकवली तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी जागतिक शिक्षक दिनाचे औचित्य साधून मंगळवारी तहसीलदार कार्यालयासमोर सामूहिक रजा आंदोलन पुकारले. महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी – शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी राज्य शासनाचं दुर्लक्ष होत असल्याने मंगळवारी शिक्षक दिनी प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने सामूहिक रजा आंदोलन छेडण्यात आले. शासनाकडून लादल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कामांबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. शिक्षकांना शिकवू द्या व विद्यार्थ्यांना शिकू द्या या प्रमुख मागणीसह, जुनी पेन्शन योजना सुरू करा व अन्य मागण्यासाठी सामूहिक रजा आंदोलन करण्यात आले, अशी माहिती महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समिती कणकवली तालुका अध्यक्ष टोनी म्हापसेकर यांनी केले.

या आंदोलनात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कणकवलीचे कार्याध्यक्ष प्रशांत दळवी, उपाध्यक्ष धीरज हुंबे, राजेंद्र कडुलकर, सहसचिव संतोष कांबळे, प्रसिद्धी प्रमुख प्रवीण कुबल, तालुका संघटक दिनेश सुद्रिक, जगन्नाथ घाडीगावकर, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा निकिता ठाकूर, तालुका महिला आघाडी अध्यक्षा नेहा मोरे, सचिव विनिता शिरसाठ, कवयित्री सरिता पवार, दिनेश जंगले, हेमंत राणे, संदीप गोसावी, शिवाजी मडव, सुनील गावकर, श्रीकृष्ण कांबळी यांच्यासह कणकवली तालुक्यातील प्राथमिक शिक्षक, शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.





