‘इंडिया’ संघटनातून देशात सत्ताबदल होईल..! : आमदार रोहित पवार यांचं मोठं विधान.

26

धुळे : उघड दडपशाही, हुकूमशाहीमुळे राज्यासह देशात भाजपविरोधात वातावरण आहे. त्याची जाणीव या पक्षाच्या नेत्यांना असल्याने त्यांना सत्ता जाण्याची भीती आहे. त्यामुळे ते पक्ष आणि कुटुंब फोडत आहेत. यात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना डिवचले आहे. त्यामुळे इंडिया संघटनातून २०२४ मध्ये सत्ताबदल, असा विश्वास राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.

शरद पवार गटाचे नेते राज्यव्यापी दौरा करीत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार पवार सोमवारी (ता. ४) धुळे येथे राष्ट्रवादीच्या मेळाव्यास उपस्थित होते. आमदार सुनील भुसारा, माजी आमदार जयदेव गायकवाड, विद्या चव्हाण, रविकांत वर्पे, राज राजापूरकर, विकास लवांदे, संदीप बेडसे, एन. सी. पाटील, विठ्ठलसिंग गिरासे, निरीक्षक उमेश पाटील, जितेंद्र मराठे, रणजित भोसले, ग्रामीण युवक जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज महाजन, उषा पाटील, शकिला बक्ष, कविता म्हेत्रे, ललित वारुडे, वाल्मीक मराठे उपस्थित होते.

आमदार पवार यांचे प्रश्‍न

आमदार पवार म्हणाले, राज्याचे राजकारण खालच्या पातळीवर जात आहे. पैशांचा अतिरेकी वापर होत आहे. अधिवेशनात जनतेच्या प्रश्‍नांवर भाजप बोलत नाही. पालकमंत्री धुळे जिल्ह्यात कधी फिरकत नाही.

मग जनतेचे प्रश्न सुटतील कसे? रोजगारासह कापसाला चांगला दर नाही, रखडलेली शिक्षक भरती, इतर भरती प्रक्रियांसाठी हजार रुपये शुल्क आकारणी आदींसारखे प्रश्‍न सत्ताधारी भाजप का सोडवित नाही? आमदाराला मंत्री करता आले नाही, तर १५० कोटींचा निधी दिला जातो. नोकरीसाठी अर्जदार तरुणांकडून हजार रुपये का घेतले जातात? आमच्यातील स्वार्थी राजकारणी सत्तेत गेले.