‘आदित्य एल-१’ पृथ्वीच्या दुसऱ्या कक्षेत, ४० हजार किलोमीटर उंचीवर पोहोचला उपग्रह.! ; इस्रोने दिली अपडेट.

66

श्रीहरिकोटा: सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारताने पाठवलेला पहिला उपग्रह ‘आदित्य एल-1’ हा पृथ्वीच्या दुसऱ्या कक्षेत पोहोचला आहे. आज पहाटे 2 वाजून 45 मिनिटांनी आदित्यचे दुसरे अर्थ-बाउंड मॅन्यूव्हर पार पडल्याचं इस्रोने सांगितलं आहे. इस्रोने आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवरुन याबाबत माहिती दिली. आदित्य उपग्रह हा सध्या पृथ्वीपासून 282×40,225 किलोमीटर उंचीवर असणाऱ्या कक्षेत पोहोचला असल्याचं इस्रोने सांगितलं. आदित्यला दुसऱ्या कक्षेत ढकलण्याची प्रक्रिया बंगळुरू येथील ISTRAC सेंटरमधून पार पाडण्यात आली. या दरम्यान संस्थेच्या मॉरिशस, बंगळुरू आणि पोर्ट ब्लेअर येथील केंद्रांवरून आदित्य उपग्रहाला ट्रॅक करण्यात आलं.

पुढील प्रक्रिया 10 सप्टेंबरला

आदित्यला पृथ्वीच्या तिसऱ्या कक्षेत पाठवण्याची प्रक्रिया 10 सप्टेंबर रोजी पार पडेल. या दिवशी पहाटे 2.30 वाजेच्या सुमारास हे मॅन्यूव्हर करण्यात येईल. हा उपग्रह सुस्थितीत असून, मोहीम यशस्वीपणे सुरू असल्याचं इस्रोने स्पष्ट केलं.

चार महिन्यांचा प्रवास

आदित्य हा उपग्रह 18 तारखेपर्यंत पृथ्वीच्या कक्षेत असणार आहे. त्यानंतर तो अंतराळात असणाऱ्या एल-1 या लॅग्रेंज पॉइंटच्या दिशेने प्रवास करेल. पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर दूर असणाऱ्या या पॉइंटवर आदित्य उपग्रह प्रस्थापित करण्यात येईल. यासाठी आदित्यला सुमारे चार महिने प्रवास करावा लागणार आहे. यानंतर एल-1 या पॉइंटवरुन पुढील पाच वर्षांपर्यंत ‘आदित्य’ सूर्याचा अभ्यास करेल. या पॉइंटवर असणारी वस्तू, त्याच ठिकाणी स्थिर राहते हे याचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच आदित्य उपग्रह या पॉइंटवर ठेवण्यात येणार आहे.