पुणेः पुण्यात कोयता गँगची दहशत सुरु असताना एक नवीनच गुन्हेगारीची घटना समोर आलेली आहे. चक्क व्हेल माशाची उलटी व्यापारासाठी जवळ बाळगण्यात आलेली होती. पोलिसांनी शिताफीने आरोपीला ताब्यात घेतलं आहे. पुण्यातील अत्यंत रहदारीचा परिसर असलेल्या गुडलक कॅफेच्या पाठीमागील बाजूस व्हेल माशाच्या उलटीची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी पाच कोटी रुपयांची उलटी जप्त करत आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
विश्वनाथ गायकवाड नामक व्यक्तीची चौकशी करण्यासाठी पोलिस गुडलक कॅफेच्या मागच्या बाजूस दाखल झाले होते. गायकवाडची तपासणी केल्यानंतर पोलिसांना त्याच्याकडे व्हेल माशाची उलटी सापडली. त्या उलटीची किंमत तब्बल पाच कोटी रुपये इतकी सांगितली जात आहे. भारतासह जगभरात व्हेल नावाच्या माशाच्या उलटीला मोठी मागणी असते. भारतात उलटीला एका किलोमागे एक कोटी रुपये मिळतात तर परदेशात ४ कोटी रुपयांपर्यंत भाव मिळू शकतो. व्हेल माशाच्या उलटीपासून उच्च प्रतीचं सुगंधी द्रव्य आणि पुढे त्यापासून फरफ्युम बनवण्यात येतो.
व्हेल माशाची उलटी आणि माशाचा कुठलाही भाग जवळ बाळगणं आणि व्यापार करणं कायद्यानुसार गुन्हा आहे. पुणे पोलिसांना व्हेल माशाच्या उलटीसंदर्भात माहिती मिळाल्याने मोठी कारवाई करण्यात आली. जप्त केलेली उलटी पाच कोटी रुपयांची असल्याचं सांगण्यात येत आहे.





