रायगड – मुरुड जंजिरा :
रुपेश रटाटे
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील गेले बारा दिवस समुद्रकिनारी अंमली पदार्थचे पाकीटे मिळत आहेत. ही पाकीटे नागरिकांच्या हाती लागू नये यांची खबरदारी म्हणून रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तालुक्यातील प्रत्येक पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या समुद्राकिनारावर रोजच्या रोज समुद्राकिनारी गस्त घालण्याचे आदेश पोलीस अधिकारी यांना देण्यात आले होते.
त्याच अनुषंगाने मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी नांदगाव समुद्राकिनारावर शोध मोहीम घेत असताना समुद्राकिनारावर अंमली पदार्थची २ पाकीटे बेवारस व भिजलेल्या स्थितीत आढळून आली. समुद्राकिनारा मोठा असल्याने दंगल नियंत्रण पथक व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व शिपाई यांना बोलावून पुन्हा शोध मोहीम सुरू केली. या शोध मोहिमेत सापडलेल्या पाकीटावर गरुड आणि नागाचे चित्र असून त्यावर ‘अफगाण प्राॅडक्ट’ असे इंग्रजी लिहीलं आहे. त्यामुळे सर्व प्रकारचे धागे-दोरे थेट अफगाणिस्तानपर्यंत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
समुद्रकिनार्यावर अंमली पदार्थची २ पाकीटे बेवारस स्थितीत आढळून आलेल्या त्या पाकीटचं वजन २ किलो १८४ ग्रॅम इतकं असून त्यांची अंदाजे किंमत ८ लाख ७३ हजार ६०० रुपये आहे.
रायगड जिल्ह्यासह अन्य तालुक्यात समुद्र किनारी चरसची पाकीट मिळत आहेत. याबाबत असा संशय व्यक्त करण्यात येत आहे की, एखादी बोट सदरचा माल किनाऱ्याला घेऊन येणार होती. परंतु सुरक्षा यंत्रणेची बोट समोर दिसताच हा माल समुद्रात फेकून देण्यात आला असावा. म्हणूनच समुद्र किनारी सदर पाकीटे सापडत आहेत.
यावेळी पोलीस निरीक्षक निशा जाधव, मुरुड तहसीलदार रोहन शिंदे, पोलीस नाईक सुरेश वाघमारे, परेश म्हात्रे, नांदगाव तलाठी अरविंद देशमुख, ग्रामपंचायत लिपीक मुकेश मिटकर, पोलीस पाटील विश्वासराव महाडीक, मुरुड पोलीस ठाण्याचे १० पोलीस शिपाई उपस्थित होते.
दरम्यान, मुरुड पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी समुद्राकिनारी लगत राहणारे व फिरण्यास येणा-या नागरिकांना आवाहन केले की, समुद्राकिनारावर बेवारस आढळलेली वस्तू आपल्या घरी घेऊन न जाता ती पोलीस ठाण्यात जमा करावी. चुकुन तुम्ही नेलेली वस्तूत चरस सारख्या अंमली पदार्थ आढळयास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल. तरी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असेही आवाहन मुरुड पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी केले आहे.





