३३ हजार शिक्षकांची भरती सुरु! ‘पवित्र’वर नोंदणीसाठी ८ सप्टेंबरपर्यंत मुदत ; ऑक्टोबरअखेर पूर्ण होणार भरती प्रक्रिया.

283

सोलापूर : साडेपाच-सहा वर्षांची प्रतीक्षा संपली, आता १ सप्टेंबरपासून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीला प्रारंभ झाला आहे. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमध्ये २३ हजार तर खासगी अनुदानित शाळांमध्ये आठ ते दहा हजार पदांची भरती होणार आहे. १ ते ८ सप्टेंबरपर्यंत उमेदवारांना ‘पवित्र’वर नोंदणी करावी लागणार आहे.

राज्यभरात जिल्हा परिषदांच्या जवळपास ७० हजार शाळा असून त्याअंतर्गत ६५ लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमध्येही विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षक खूपच कमी आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नयेत म्हणून ‘शिक्षण सारथी’ योजनेतून सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता.

पण, आता त्यांची नियुक्ती थांबविण्यात आली असून त्या शाळांना भरतीतून नवीन शिक्षक दिले जाणार आहेत. साधारणत: ऑक्टोबरअखेर ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. तत्पूर्वी, जिल्हा परिषदांच्या शिक्षण विभागाची बिंदुनामावली अंतिम झाल्यावर एकत्रितपणे भरतीला सुरवात होईल.

सध्या ‘पवित्र’वर उमेदवारांना नोंदणी करावी लागणार असून त्यात त्यांना प्राधान्यक्रम, जातसंवर्ग, विषयानुसार माहिती अपलोड करावी लागणार आहे. त्यानंतर संबंधित जिल्हा परिषदांच्या अंतिम बिंदुनामावलीनुसार कागदपत्रे व गुणांची पडताळणी होवून उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल आणि अंतिम निवडी होतील, असे भरतीचे टप्पे आहेत.

‘खासगी’ची पदे ३ महिन्यानंतर पुन्हा भरता येणार

खासगी अनुदानित शाळा, महाविद्यालयांमधील बिंदुनामावली व संचमान्यतेनुसार जेवढी रिक्त पदे असतील, त्यानुसार त्यांना ‘पवित्र’वर जाहिरात अपलोड करावी लागणार आहे. पण, काही शाळांना आताच्या भरतीत सहभागी होता नाही आले आणि काही दिवसांनी त्यांची पदे रिक्त झाल्यास पुन्हा तीन महिन्यांनी भरतीत सहभागी होता येणार आहे. नवीन बदलानुसार आता खासगी संस्थांमधील शिक्षकांची भरती ‘पवित्र’वरूनच होणार आहे. त्यासाठी तीन उमेदवारांना त्या शाळांवर मुलाखतीसाठी पाठविले जाणार आहे.

आता जिल्हाअंतर्गत बदली कायमची रद्द

प्रत्येक वर्षी जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया ग्रामविकास विभागाकडून राबविली जाते. आता ही बदली प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. पण, अनेकदा पूर्वीच्या शाळांना पुरेसे शिक्षक होते, पण बदल्यांमुळे तेथे शिक्षक कमी पडतात, असा अनुभव अनेकदा आला आहे. त्यामुळे आता नवीन शिक्षक भरतीवेळी उमेदवारांकडून एकाच शाळेवर कायमस्वरूपी नोकरीसाठी तयार असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. जिल्हाअंतर्गत बदलीची पद्धत आता बंद होणार आहे. तसा प्रस्ताव आहे, पण त्यावर अजून निर्णय झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

शिक्षक भरतीची स्थिती

  • शासकीय शाळांची पदे
  • २३०००
  • ‘खासगी अनुदानित’ची पदे
  • ८ ते १० हजार
  • अंदाजे एकूण पदभरती
  • ३३,०००
  • बिंदुनामावली अंतिम जिल्हा परिषदा
  • १२