दुर्गा जाधव, आदिती सावंत राष्ट्रीय पातळीवर चमकल्या !, नॅशनल ऑल इंडिया कुराश स्पर्धेत कांस्यपदक ! ; DYSP संध्या गावडे, BDO वासुदेव नाईक यांच्याहस्ते झाला सन्मान!

155

सावंतवाडी : मध्य प्रदेशच्या इंदूर येथे नुकत्याच पार पडलेल्या कुराश स्पर्धेत सावंतवाडी येथील दुर्गा जाधव व अदिती सावंत यांची निवड झाली होती.
या स्पर्धेत दोघांनीही चमकदार खेळ करत आपले नाव कांस्यपदकावर कोरले आहे. या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा ज्युडो कराटे आकीदो असोसिएशनच्या वतीने दैवज्ञ गणेश मंदिर हॉल येथे सत्कार तसेच विद्यार्थ्यांसाठी रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित केला होता.

यावेळी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या दुर्गा जाधव, आदिती सावंत, काव्या तळवणेकर, श्लोक चांदेलकर, कोमल बिस्वा, यश कडव, निधी राऊत, ओम परब, आबान बेग तसेच ऑल इंडिया स्पर्धेत पंच म्हणून निवड झालेल्या
दिनेश जाधव यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वसंत जाधव यांचा पालकांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी संध्या गावडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, गेली ४३ वर्षे जाधव सर ही संस्था चालवत आहेत. एका छोट्या रोपट्याचं त्याने आज वटवृक्ष केले आहे. हे त्याने केलेले कार्य कौतुकास्पद आहे. जुडो कराटेच्या विद्यार्थ्यांना सरांनी खेळाबरोबर आरोग्य तसेच शिस्तही लावली आहे. या कार्यक्रमात येऊन मला माझ्या आईची आठवण झाली. आज मी जे काही घडले आहे. हे सर्व माझ्या आईमुळे. माझ्या आईने माझ्या भावात किंवा माझ्यात कोणतेही अंतर न ठेवता त्यांच्या बरोबरीने वागवले त्यामुळे मी एक अधिकारी म्हणून आज वावरत आहे.

श्रीम. गावडे यांनी विद्यार्थी व पालकांना व कायदेविषयक मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, लहान वयात आपल्या पाल्याला गाडी चालवायला देऊ नये. लहान वयात गाडी चालवायला देणे हा गुन्हा आहे. अशी गाडी चालवताना कोणी आढळल्यास ज्याच्या नावे गाडी असेल त्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येते. तसेच प्रत्येक वाहन चालकाने आपली स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे गाडी चालवताना सीट बेल्ट लावणे, हेल्मेट परिधान करणे हे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येकाने आपला जीव सांभाळून वाहन चालवावीत.

गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी जाधव सर यांचे कौतुक केले. ते म्हणाले, गेले ४३ वर्ष संस्था चालवणे ही छोटी गोष्ट नाही. आणि त्यातून असे विद्यार्थी घडवणे हे महान कार्य आहे. आज आपण येथील खेळाडूंनी केलेल्या प्रात्यक्षिके पाहिल्यानंतर भारावून गेलो आहे. मी कॉलेजमध्ये असताना मला जुडो कराटेची आवड होती. आपल्या मित्राने याविषयी थोडे मार्गदर्शन करून आवड निर्माण केली होती. परंतु जुडो कराटेसारखा खेळ योग्य प्रशिक्षित अथवा त्यात पारंगत असलेल्या प्रशिक्षकांकडूनच हे प्रशिक्षण घेणे उचित ठरेल, अन्यथा त्याचे विपरीत परिणाम ही होऊ शकतात. श्री. नाईक यांनी यावेळी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वसंत जाधव यांनी सांगितले की, आपण संस्था स्थापन केल्यापासून ४३ वर्ष झाली आहेत. या कालावधीत बरेचसे विद्यार्थी मोठमोठे अधिकारी, वकील, डॉक्टर, इंजिनियर अशा उच्च स्थानावर कार्यरत आहेत. संस्था चालवत असताना आपल्याला बरेचशा प्रसंगांना सामोरे जावे लागले. लोकांनी हा मारामारीचा खेळ, डोंबाऱ्याचा खेळ, अशाप्रकारे हिणवले परंतु याची आपण तमा न बाळगता आपलं कार्य सतत चालू ठेवलं. मी जुडो कराटे साठी सरकारी नोकऱ्या सुद्धा सोडले आहेत. याचंच आज फलित म्हणून माझे विद्यार्थी नॅशनल इंटरनॅशनल सारख्या स्पर्धा खेळून यशस्वी झाले आहेत. या सर्व कार्यात्मला माझ्या सहकाऱ्यांचे तसेच पालकांचे मोठे योगदान मिळाले आहे. आपण दरवर्षी या संस्थेच्या वतीने रक्षाबंधन हा सण साजरा करतो. परंतु विद्यार्थ्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी संध्या गावडे मॅडम सारख्या अहोरात्र जनतेच्या रक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांचा आशीर्वाद मिळावा आज त्यांना या कार्यक्रमाला प्राचारण करण्यात आलं. यावेळी राष्ट्रीय व राज्य स्थरीय यश संपादन केलेल्या खेळाडूंचे त्यांनी अभिनंदन केले.

कार्यक्रमास उपगटविकास अधिकारी प्रशांत चव्हाण, श्री. धरणे, संस्थेचे प्रशिक्षक दिनेश जाधव, सनी जाधव, संस्थेचे पालक प्रतिनिधी सौ. स्वप्नाली कारेकर, अमित तळवणेकर, सौ. कार्लेकर, सौ. गावडे, सौ. मोहिते, आजी-माजी विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ पूजा जाधव यांनी केले.