मुंबई : मुंबईत आज विरोधकांनी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीची तिसरी दोन दिवसीय बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्दांवर चर्चा झाली. तसेच अनेक समित्या देखील स्थापन करण्यात आल्या आहेत. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणूक लढविण्यासह ओबीसी जनगणनेबाबत सुतोवाच करण्यात आले.
‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ओबीसी जनगणना व्हायला हवी, याबाबत इच्छा व्यक्त केली. याबाबत २ ऑक्टोबरला चौथी बैठक दिल्लीला होण्याची शक्यता आहे. यावेळी एकाच व्यक्तीला संयोजक न करता संयुक्त लढाई लढण्याच्या प्रस्तावाबाबतही निर्णय दिल्लीला होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान केरळ आणि पश्चिम बंगाल वगळता समन्वय समिती नेमण्यात अडचण नसल्याचं समजतं. शिवाय ईव्हीएमविरोधात ओरड करणे अयोग्य असल्याची चर्चाही बैठकीत झाली. तसेच ४०० लोकसभा मतदार संघात एकास एक लढत देण्याची रणनिती इंडिया आघाडीत चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.





