खळबळजनक – ‘CBI’ कडून ‘ED’ अधिकाऱ्याला अटक.! ; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

141

नवी दिल्ली : दिल्ली दारू घोटाळ्यात नवा ट्विस्ट आला आहे. केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयने अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) सहायक संचालक पवन खत्री यांना अटक केली आहे. मद्यविक्रेते अमनदीप ढल यांच्याकडून 5 कोटींची लाच घेतल्याच्या आरोपावरून खत्री यांना अटक करण्यात आली आहे.

सीबीआयने दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीचे सहायक संचालक  पवन खत्री, एअर इंडियाचे कर्मचारी दीपक सांगवान, क्लेरिजेस हॉटेल्स अँड रिसॉर्ट्सचे सीईओ विक्रमादित्य आणि इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली दारू घोटाळा प्रकरणाच्या तपासादरम्यान ईडीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या नावाने लाच घेणार गट कार्यरत असल्याचे समोर आले आहे.

गुन्हेगारी षडयंत्र, लोकसेवकाला लाच दिल्याबद्दलचा गुन्हा, भ्रष्ट किंवा बेकायदेशीर मार्गाने किंवा वैयक्तिक प्रभावाचा वापर करून सार्वजनिक सेवकावर प्रभाव पाडण्यासाठी अवाजवी फायदा घेणे, लोकसेवकाच्या लाचेशी संबंधित गुन्हा या अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

सीबीआयने ईडीचे सहाय्यक संचालक पवन खत्री यांना मद्यविक्रेते अमनदीप धल्ल यांच्याकडून पाच कोटी रुपयांच्या कथित पेमेंटप्रकरणी अटक केली आहे. याआधी शुक्रवारी याप्रकरणी अटक करण्यात आलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना राऊस अॅव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले होते.

सीबीआय आणि ईडी या दोन्ही तपास यंत्रणांनी सिसोदिया यांच्यावर दारू घोटाळ्यात आरोप केले आहेत. तपास यंत्रणांनी सिसोदिया यांची सर्व खाती जप्त केली आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 सप्टेंबर रोजी होणार आहे. सिसोदिया यांनी नुकतीच वैद्यकीय आणि इतर खर्चासाठी बँक खात्यातून काही रक्कम काढण्याची परवानगी मागितली होती.