सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सौंदर्य अन् पर्यावरणाला POP गणेश व देवीच्या मूर्तीच्या विसर्जनामुळे बाधा.!

30

सिंधुदुर्ग : स्वच्छ सुंदर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यावरणाला प्लास्टर ऑफ पॅरिस गणेश व देवीच्या मूर्तीच्या विसर्जनामुळे बाधा येत आहे. त्यामुळे त्या मुर्त्या तयार करणे, आयात करणे व साठवणूक करणे वर बंदी घालण्यात यावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा श्री गणेश मूर्तिकार संघाने जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा श्री गणेश मूर्तिकार संघाचे अध्यक्ष नारायण उर्फ बापू सावंत, संचालक अरुण पालकर, विलास मळगावकर आदींनी जिल्हाधिकारी यांना आज हे निवेदन दिले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्गाचे वरदान असलेला जिल्हा आहे. निसर्ग सौंदर्य, समुद्रकिनारा , नद्यां नाले, तलाव, धबधबे यांनी नटलेला आहे. या सौंदर्यांची जोपासना करणे हे सिंधुदुर्ग वासियांचे कर्तव्य आहे. त्यांला बाधा येऊ नये असेही त्यांनी या निवेदनात म्हटले आहे गणेश उत्सवात घराघरात गणेश मूर्तीचे पूजन करून साजरा केला जातो. पूर्वीपासून गणेश मूर्ती ही मातीचीच केली जात होती ती पाण्यात सहज विरघळत असते पण गेल्या आठ ते दहा वर्षापासून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती जिल्ह्या बाहेरून आयात केल्या जात आहेत . त्या पाण्यात विरघळत नसल्याने समुद्रकिनारी, नदीकिनारी, तलावात, नाल्यात त्या मुर्त्या विसर्जन झाल्यावर बरेच महिने भग्न अवस्थेत दिसतात. ज्या भावनेने मनोभावे मूर्तीची पूजा केलेली असते त्या अशा अवस्थेत पाहील्यावर धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत असे या निवेदनात श्री. सावंत यांनी म्हटले आहे.

धार्मिक दृष्ट्या या मुर्त्या मातीच्या असाव्यात हे धर्मशास्त्रात सांगितले आहे आणि त्या ग्रंथांच्या आधारे पूर्वापार मातीच्या मुर्त्या बनविला जात आहे. सिंधुदुर्गात मातीच्या मुर्त्या करणारे हजारो कारागीर आहेत त्यांच्या पिढ्यानपिढ्या गणेश मूर्ती बनवण्याच्या शाळा- चित्रशाळा आहेत. पण ज्यांना या मातीवर काम करणे जमत नाही किंवा काम करण्याचा आळस असल्याने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या तयार मुर्त्या पेण, पनवेल, कोल्हापूर येथून आणून विकल्या जात आहेत,बाहेरून मुर्त्या आणून विकत असल्याने सिंधुदुर्गातील गोरगरिबांच्या पैसा जिल्हा बाहेर जात आहे व खरा अर्थाने कारागीरांचे काम कमी होत आहे. त्यामुळे मातीच्या मुर्त्या तयार करणाऱ्या कारागीरावर उपासमारीची पाळी येण्याची भीती असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार मूर्ती व्यवसायातील प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यावर बंदी आणून दहा वर्षे झाली तरी अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही १२ मे २०२० रोजी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्सवासंबंधी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत त्यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती घडू नये अशी स्पष्टता दिली आहे. जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये ही बंदी देशभरात लागू झाली आहे तशी ती महाराष्ट्र राज्यातील लागू आहे. पर्यायाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातही लागू आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे सूट देण्यात आलेली नाही, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मॉनिटरिंग कमिटीने सन २००३ मध्ये कुठल्याही कारणाने पाण्याचे प्रदूषण करणे हा दंडणीय अपराध आहे त्यामुळे प्रत्येक राज्याने या संदर्भात खंबीर भूमिका घेऊन योग्य ती कारवाई करावी असा आदेश दिला आहे त्याची पायमल्ली होत असल्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष या निवेदनाद्वारे वेधण्यात आले
आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची निर्मिती, विक्री, आयात व साठवणूक यावर प्रभावी अंमलबजावणीसह धोरणात्मक कार्यवाही व्हावी याकरिता नगरपालिका, जिल्हा परिषद यांना स्मरणपत्र देऊन तात्काळ पीओपी मूर्ती बंदीचे आदेश देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही याकडे जिल्हा प्रशासनाने त्वरित लक्ष घालून अंमलबजावणी करावी आणि संबंधितावर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी श्री गणेश मूर्तिकार संघाने केली आहे.