कुडाळ : कुडाळ व मालवण आगारात एसटी गाड्यांची कमतरता असल्याची तक्रार आमदार वैभव नाईक यांच्याकडे एसटी वाहक व कर्मचाऱ्यांनी केली होती. त्यानुसार आमदार वैभव नाईक यांनी एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक शेखर चन्ने व सिंधुदुर्ग एसटीचे विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांच्यासमवेत चर्चा करून कुडाळ व मालवण आगारासाठी नवीन एसटी गाड्या देण्याची मागणी केली होती.
आ. नाईक यांची सदर मागणी मान्य करत शासनाने कुडाळ आगारासाठी ६ स्लीपर व ४ साध्या अशा एकूण १० नवीन एसटी गाड्या आणि मालवण आगारासाठी ४ नवीन एसटी गाड्या देण्याचे शेखर चन्ने यांनी मान्य केले होते. यातील १ स्लीपर गाडी आज कुडाळ आगारात दाखल होणार आहे. अन्य गाड्याही लवकरच दाखल होणार असल्याची माहिती आ. वैभव नाईक यांनी दिली आहे.





