सावंतवाडी : येथील लायन्स क्लब ऑफ सावंतवाडी व सुधाताई कामत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक २ यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यार्थ्यांचे नेत्र तपासणी शिबिर व ‘डोळ्यांची काळजी’ या विषयावर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले.

सावंतवाडीतील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. विशाल पाटील यांनी सदर शिबिरात विद्यार्थ्यांना डोळ्यांची निगा कशी राखावी?, डोळ्यांची साथ आल्यास कशा पद्धतीने उपचार घ्यावेत? याविषयी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष अमेय पई, माजी अध्यक्ष अशोक देसाई, बाळासाहेब बोर्डेकर, डॉ. टकेकर मॅडम, तसेच सावंतवाडी लायन्स क्लबचे पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

दरम्यान या नेत्ररोग तपासणी शिबिरातून 145 विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. लायन्स क्लबच्या या उपक्रमाचे पालकांनी कौतुक केले आहे.






