९ आमदार अन् २ खासदारांवर अपात्रतेची कारवाई? ; विधानसभा अध्यक्ष, लोकसभा सभापतींना राष्ट्रवादीकडून पत्र?

129

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने विधानसभा अध्यक्ष आणि लोकसभेचे सभापती यांना पत्र लिहिले असून ९ आमदार आणि २ खासदार यांच्या अपात्रेतेच्या कारवाईची मागणी केली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवरुन जो संभ्रम निर्माण झालाय, तो दूर होण्यास मदत होणार आहे. परिषिष्ठ १० मध्ये जी तरतूद आहे त्यानुसार ९ आमदार आणि २ खासदार यांनी पक्षाच्या घटनेविरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे या आमदार आणि खासदारांवर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी पत्रामध्ये करण्यात आल्याचं समजतंय.

राष्ट्रवादीतून फुटल्यानंतर पक्षाकडून अजित पवार आणि इतर नेत्यांना नोटिस पाठवली होती. त्याला आणखीन उत्तर मिळाले नाही. उत्तर मिळण्याची वाट न पाहता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून विधानसभा अध्यक्ष आणि लोकसभा सभापती यांना आमदार आणि खासदार यांच्यावर अपात्र ठरवण्याची कारवाई करावी यासाठी पत्र लिहिण्यात आलं आहे. निवडणूक आयोगासमोर जेव्हा सुनावणी होईल तेव्हा अजित पवार गटाने पक्षाविरोधात भूमिका घेतली त्यामुळे त्यांना अपात्रता ठरवा अशी मागणी शरद पवार गट करणार असल्याचं सांगण्यात येतंय. अद्याप विधानसभा अध्यक्ष किंवा लोकसभा सभापती यांनी या पत्रावर कार्यवाही केलेली नाही अशी सूत्रांची माहिती आहे.