आजचे चिंतन – प्रेमाचा महापूर..! – शिक्षणतज्ज्ञ डॉ. ह. ना. जगताप यांचे विवेचन.

117

कधी काळी हिंदी सिनेमा मध्ये प्रेम हीच मध्यवर्ती कल्पना असे. आणि आम्ही या अशा सिनेमाचे भाबडे प्रेक्षक असल्याने त्याचा आमच्यावर खूपच परिणाम होत असे. बालवयात व तारुण्यातील परिणाम दीर्घकाळ टिकत असल्याने आमच्यावर याचा खूपच प्रभाव राहिला आहे. त्यामुळेच की, काय आम्ही प्राध्यापक म्हणून काम करताना आमच्या बी.एड. च्या विद्यार्थ्यांना प्रेमळ राहण्याचा सल्ला देत असू. प्रेमानेच मुले किंवा माणसे सुधारतात असे आमचे ठाम मत होते व आहे. परंतु अलिकडे या प्रेमाचा अतिरेक सर्वच क्षेत्रात होतो आहे असे जाणवते.
कोणीही कोणालाही दुखवायचे नाही या भावनेने प्रत्येक जण वागत असल्याचे जाणवते. मुलांना पालकांनी चुकिच्या वर्तनासाठी देखील रागवायचे नाही शिक्षा तर दूरच ! विद्यार्थ्यांनी वर्गात बेशिस्त व बेजबाबदार वर्तन केले तरी शिक्षकांनी त्याला बोलायचे नाही किंवा रागवायचे नाही.

हे लोण अगदी समाजातील प्रत्येक घटकापर्यत पोहोचले आहे. शिक्षकाने कामचुकारपणा केला किंवा बेशिस्त वर्तन केले तरी मुख्याध्यापकांनी त्यांना शिक्षा करायची नाही. शक्यतो प्रेमानेच त्यांची समजूत काढायची प्रसंगी विद्यार्थ्यांचे नुकसान झाले तरी चालेल परंतु शिक्षकाला मानसिक त्रास होता कामा नये.
एखाद्या शासकीय कार्यालयातील कर्मचार्‍याने काम केले नाही तरी त्याच्यावर कोणतीही कारवाई करायची नाही. चुकून एखादा कर्मचारी लाच घेताना सापडला तरी शक्यतो ऑफिसमधील सर्वांनी त्याला सांभाळून घ्यायचे त्याला शिक्षा कशी होणार नाही यासाठी प्रयत्न करायचे आणि हे कां ‘, तर त्या कर्मचाऱ्यावरील प्रेमासाठी ! एकमेकांना सांभाळून घेणे हे प्रेमाचेच लक्षण नव्हे काय ?
इतकेच काय परंतु कायद्याचे रक्षण करणारे कठोर समजले जाणारे पोलीस खाते देखील हल्ली खूप प्रेमानेच वागते. एखाद्या ठिकाणी दंगल चालू असली तरी दंगलखोरांना त्रास होवू नये म्हणून स्वतः पोलीस अलिप्त राहतात. पूर्वी गुन्हेगाराकडून माहिती काढून घेण्यासाठी थर्ड डिग्री पद्धतीचा सरासअवलंब केला जात असे. परंतु अलिकडे हे निषिद्ध मानले जाते.
एखाद्या राज्यात दंगल सदृष्य परिस्थिती निर्माण झाली तरी त्या राज्याचे गृहमंत्री संबंधितावर कारवाईचे आदेश देण्याऐवजी दंगलखोरांना दंगल शमवण्याचे आवाहन करतात. हे दंगलखोरावर असलेल्या प्रेमापोटीच शेवटी दंगलखोर देखील माणसेच असतात ना!
याचा परिणाम असा झाला आहे की, कोणावरही कोणाचा वचक राहिलेला नाही. असा वचक असणे किंवा ठेवणे हे अधिकार शाहीचे किंवा हुकुमशाहीचे लक्षण मानले जाते. त्यामुळेच माझ्या एका मित्राचे लाडके वचन हळूहळू मलाही पटू लागले आहे तो म्हणतो,” भारत हा असा देश आहे की जेथे ज्या कामासाठी ज्या व्यक्तिला नेमले आहे. ते काम त्या व्यक्तिला करता येत नाही किंवा ती व्यक्ती ते काम करत नाही, म्हणून त्या व्यक्तिला कामावरून काढून टाकता येत नाही.”
आणि हे कां तर कर्मचाऱ्यांवरील प्रेमामुळे ! अगदी शाळेच्या मुख्याध्यापकांपासून ते थेट राष्ट्राच्या प्रमुखापर्यंत कोणीही कर्तव्य कठोर निर्णय घ्यायला तयार नाही. कधी काळी आपण शिकविलेल्या शिकवणुकीचा असाही परिणाम होईल असे वाटले नव्हते.

  • – डॉ. ह.ना. जगताप.