ऐजॉल : मिझोराममधील साईरंग परिसरात रेल्वेचा बांधकाम सुरू असलेला पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत किमान १७ कामगारांचा मृत्यू झाला. पुलाच्या कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली अनेक कामगार अडकल्याची भीती वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.मिझोरामची राजधानी ऐजॉलपासून २१ किमी अंतरावर आज सकाळी दहा वाजता ही दुर्घटना घडली. त्या वेळी या ठिकाणी ३५ ते ४० कामगार काम करत होते. पुलाच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत १७ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, अनेक जण बेपत्ता आहेत. त्यांच्यासाठी मदत व बचावकार्य राबविण्यात येत आहे.
‘एक्स’(पूर्वीचे ट्विटर) वर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये तसेच जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली.
मिझोरामचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे, बचावकार्य राबविणाऱ्यांचेही आभार मानले आहेत. दरम्यान, या दुर्घटनेतील काही कामगार प. बंगालमधील माल्डा जिल्ह्यातील असल्याची माहिती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘एक्स’ वरील पोस्टद्वारे दिली. प.बंगालच्या मुख्य सचिवांना मदत व बचावकार्यासाठी मिझोराम प्रशासनाबरोबर समन्वय साधण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.
रेल्वेकडून मृतांना दहा लाख
या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना रेल्वेतर्फे प्रत्येकी दहा लाख तर गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी दोन लाख आणि किरकोळ जखमी झालेल्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये मदतीची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. त्याचप्रमाणे, या दुर्घटनेच्या चौकशीसाठी त्यांनी उच्चस्तरीय समिती नेमण्याचेही आदेश दिले.





