पाणी पुरवठा सुरळीत करा..! ; आनंदवाडी ग्रामस्थांनी दिले नगरपंचायतीला निवेदन !

69

देवगड : देवगड – जामसंडे नळ योजनेच्या प्रश्न आजही अधांतरीच आहे. ग्रामपंचायतची नगरपंचायत झाली तरी हा प्रश्न मात्र मिटलेला नाही. देवगड शहरातील आनंदवाडी येथे सलग पाच दिवस पाणीपुरवठा न झाल्याने आनंदवाडी येथील ग्रामस्थांनी व महिलांनी नगरपंचायत कार्यालय धडक देत नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी यांना याबद्दल जाब विचारत, निवेदन सादर केले. दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत होईल असे आश्वासन आनंदवाडी येथील शिष्टमंडळांना यावेळी नगरपंचायतीच्या वतीने देण्यात आले.


यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,नळ योजनेचा उन्हाळ्यात प्रॉब्लेम झाल्याने उन्हाळ्यात महिन्यातून दोनदा किंवा तीनदा पाणीपुरवठा होत होता. तरीही आम्ही तुमची अडचण जाणून गप्प होतो. त्यावेळी पाण्याचा स्त्रोत आटलेला होता हे कारण होते. मग आता पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी आपण नीटपणे पाणीपुरवठा का केला जात नाही. महिन्यातून चार वेळा पाणीपुरवठा चालू आहे तो सुद्धा कमी दाबाने आता पाणी मुबलक असताना सुद्धा जर पाणीपुरवठा एक दिवसाआड होत नाही तर तुम्ही विनाकारण आम्हा लोकांना त्रास देणे आहात असे म्हणण्यास जागा आहे. काही वॉर्ड मध्ये सुरळीतपणे दोन किंवा तीन दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. तेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक आमच्या आनंदवाडी गावाला त्रास देण्यासाठी पाणीपुरवठा नीटपणे करत नाही आहात असे आमचे म्हणणे आहे.जर यानंतर सुरळीतपणे पाणीपुरवठा झाला नाही तर जे काही होईल. त्याची संपूर्ण जबाबदारी जे सत्ताधारी आहे त्यांची राहील अशा आशयाचे निवेदन आनंदवाडी येथील ग्रामस्थांनी देवगड जामसंडे नगरपंचायतचे प्रशासकीय अधिकारी श्री स्वामी यांना दिले. या शिष्टमंडळात संजय बांदेकर अण्णा खवळे, हनुमंत कुबल, दिनेश पोसम, अनिता कुबल आदि उपस्थित होते