दोडामार्ग : दोडामार्ग शहरात खोदलेले रस्ते शहरवासीयांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. बाजारपेठेतील रस्त्यावर धुळीचे साम्राज्य झाले असून बांधकाम विभाग मात्र तो मी नव्हेच या भूमिकेत आहे. माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे यांनी बांधकाम विभाग दोडामार्ग यांच्या कार्यालयात ठिय्या करत बांधकामच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी स्वीकृत नगरसेवक पांडुरंग बोर्डेकर, व्यापारी अध्यक्ष लवू मिरकर, विजय मोहिते आदी उपस्थित होते.
यावेळी बांधकाम अभियंता विजय चव्हाण यांनी सदरच्या रस्त्यांचे काम पुढील चार दिवसात हाती घेण्यात येईल असे सांगितले, धुळीचे साम्राज्य त्यामुळे व्यापारी वर्गाचे होणारे नुकसान अशा परिस्थितीत जर बांधकाम विभागाला वाटत असेल की शहराला कोणी वाली नाही तर वेगळ्या स्टाईलने उत्तर देऊ. आम्हाला रस्त्यावर उतरायला भाग पाडू नका असा इशारा यावेळी संतोष नानचे यांनी बांधकाम विभागाला दिला.





