बांदा : केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही डेगवे मार्गे तांबुळी येथे जाताना वनविभागाच्या हद्दीद असलेला 80 मिटरचा रस्ता पूर्ण करता येत नाही हे दुर्दैव आहे. तांबुळी गावातील अपक्ष ग्रामपंचायत सदस्यांच्या प्रवेशाकरीता सर्व पक्ष त्यांच्याकडे जात आहेत. परंतु गेली अनेक वर्षे सदर जागा वनविभागाच्या ताब्यात असून ग्रामस्थांना याचा त्रास सहन करावा लागतो. याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. त्यामुऴे सदर रस्त्यासाठी ग्रामस्थांनी दिलेले निवेदन योग्य ठिकाणी पोहचवून वेळप्रसंगी वनखात्याला घेराव घालू, आंदोलन करू आणि त्याची तारीख तुम्ही ठरवा मनसेची पूर्ण ताकद तांबुळी गावाच्या पाठीशी राहील अशी ग्वाही, महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरचिटणीस संदिप दळवी यांनी दिली.
कोंडुरा तिठा पारिजात सभागृहात आयोजित संवाद मेळाव्यात संदिप दळवी बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना सरचिटणीस गजानन राणे, माजी जिल्हा अध्यक्ष धिरज परब तसेच अमोल साळुंखे, अॅड.अनिल केसरकर, अॅड.राजू कासकर, बांदा माजी विभाग अध्यक्ष मिलिंद सावंत, तसेच योगेश सावंत, मनिष धुरी, आशिष सुभेदार, अनिषा माजगावकर, गुरूदास गवंडे, सावंतवाडी माजी संपर्क अध्यक्ष महेश परब, नालासोपारा विभाग उपाध्यक्ष अमित नाईक, अतुल केसरकर, मंदार नाईक आदी उपस्थित होते.
श्री.दळवी पुढे म्हणाले की, आपल्या पक्षाचा ग्रामपंचायत सदस्य बनला पाहिजे अशी भूमिका प्रत्येक पक्षाची आहे परंतु आपला रस्ता बनला पाहिजे, आंदोलन झाले पाहिजे अशी कुठलीही भावना नाही. मात्र तांबुळी रस्त्याकरीता मनसे आंदोलन करणार, वनखात्याला घेराव घालणार आणि त्याठिकाणी झालेली लाकुडतोड त्यासंदर्भात वनखात्याला घेरल्याशिवाय आपण राहणार नाही. तारीख तुम्ही ठरवा, एवढेच नाही तर ज्या ठिकाणी मनसेची गरज लागेल त्या ठिकाणी मनसेची पूर्ण ताकद तुम्हाला मिळेल अशी ग्वाही दिली. गाव तेथे शाखा आणि शाखा तेथे शाखाध्यक्ष नेमण्याचा संकल्प सुरू केला आहे. प्रत्येक शाखाध्यक्षाला नारळ व आंब्याची दहा झाडे दिली जातील. कारण तुम्ही पक्ष सोडाल, फलक काढाल परंतु आमची झाडे कशी सोडणार असे सांगत कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली.
कामगार सेना सरचिटणीस गजानन राणे म्हणाले की, तांबुळी गावात अपक्ष सदस्यांनी धनदांडग्या पक्षाविरुद्ध लढून आपल्या सहा जागा निवडून आणल्यात. त्यांची रस्त्याची समस्या मार्गी लावण्यासाठी योग्य ते पाऊल उचलणार आहोत. काही गावात बोलले जाते की पैशाशिवाय काही होत नाही. परंतु गेल्या काही वर्षातील निवडणुका पाहिल्यास येथील धनदांडगे राजकारणी विधानसभा लढविताना तोंडघाशी पडलेत, त्यांचा मुलगा लोकसभेला पडला. तर केवळ पैसा असणे महत्वाचे नाही तर आपल्याकडे जिद्द असणे आवश्यक आहे आणि यावरच मनसे येत्या काळात सिंधुदुर्गात आपला झेंडा नक्कीच फडकवेल, असा विश्वास व्यक्त केला.
सावंतवाडी शहरातील व आंबोली गावातील कार्यकर्त्यांनी यावेळी मनसेत प्रवेश केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश परब व अनिल केसरकर यांनी केले. सुत्रसंचालन साहिल तळकटकर यांनी केले. मान्य़वरांनी आपले मनोगत व्यक्त केले. अमित नाईक यांनी आभार मानल्यानंतर राष्ट्रगीताने मेळाव्याची सांगता झाली.





