पुणे : ‘‘सक्त वसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवाईमुळे आपल्या काही सहकाऱ्यांनी रस्ता बदलला. आज ते भाजपकडे गेले. परंतु ते आजही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहोत. आमची वैचारिक भूमिका बदललेली नाही.
फक्त तिकडे ‘आत’ जावे लागू नये, म्हणून ही भूमिका घेतल्याचे सांगतात. मात्र राजकारणात सत्याची कास सोडून जाणाऱ्यांना जनता भविष्यात वेगळी जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिला
पुण्यात रविवारी (ता. २०) आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. पवार म्हणाले, ‘‘सध्या राज्यासमोर महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी असे अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांना बाजारपेठेत योग्य भाव मिळत नाही, याची नागरिकांना चिंता आहे.
गेल्या सहा महिन्यांत महाराष्ट्रातील किती उद्योग-कारखाने गुजरात आणि इतर राज्यात गेले? तुम्ही गुजरातमध्ये कारखाने जरूर काढा. परंतु महाराष्ट्रात येणारे कारखाने येथून अन्य राज्यात नेले. त्यामुळे राज्य सरकारने चांगले काम करण्याची संधी गमावली आहे.’’
कांदा निर्यात धोरणावर सडकून टीका –
केंद्राच्या शेतमालाच्या निर्यात धोरणावर पवार यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘‘सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्कवाढ केली आहे. त्यामुळे जगातील बाजारपेठ शेतकऱ्यांसाठी बंद झाली आहे. महाराष्ट्राच्या हिताच्या विरोधात आणि शेतकरीविरोधी निर्णय घेतले जात आहेत. त्याचा कडाडून विरोध केला पाहिजे. तरच भविष्यात केंद्र सरकार निर्णय घेताना विचार करेल.’’





