देवगड : लाईफ लाईन फाऊंडेशनतर्फे देवगड तालुक्यात गेली पस्तीस वर्षे अनेक समाजोपयोगी वैद्यकीय उपक्रम राबवण्यात येतात. आत्तापर्यंत या फाऊंडेशन तर्फे दीड हजारपेक्षा अधिक वैद्यकीय शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. तीस हजार पेक्षा अधिक रुग्णांना मोफत तपासणी उपचार करण्यात आली आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून एक सामाजिक योगदान म्हणून 15 ऑगस्टच्या निमित्ताने देवगड मेडिकल फाऊंडेशन डॉ. आठवले कॅम्पस येथे अत्याधुनिक डी. डी. आर. (डायनामिक डिजिटल रेडिओलॉजी प्रणालीद्वारा) रुग्णांची सवलतीच्या दरात एक्स-रे सुविधा देण्यात आली. या शिबिरासाठी कोनिका मिनोल्टाचे फिफ्थ जनरेशन टेक्नॉलॉजी असलेले युनिट वापरण्यात आले.
हे एक्स-रे युनिट भारतातले पाचवे आणि महाराष्ट्रातील तिसरे मशीन आहे. आवश्यक त्या रुग्णांची डोळ्यांची मोफत तपासणी करण्यात आली . या शिबिराचा 100 पेक्षा अधिक रुग्णांनी फायदा घेतला. भविष्यात अशा प्रकारचे अनेक उपक्रम करण्यात येतील, असे लाइफ लाईन फाऊंडेशनतर्फे डॉ. तन्मय आठवले यांनी जाहीर केले.





