निरोगी आयुष्यासाठी व्यायाम शाळा ही काळाची गरज : हेमंत मराठे, डी जे फिटनेस व्यायाम शाळेचा शुभारंभ

सावंतवाडी : मळेवाड जकातनाका येथील डी जे फिटनेस व्यायाम शाळेचा सरपंच मिलन पार्सेकर व उपसरपंच हेमंत मराठे यांच्या शुभ हस्ते शुभारंभ करण्यात आला.

मळेवाड दशक्रोशितील युवकांसाठी अद्ययावत व्यायाम शाळा सेवा मिळावी याकरिता मळेवाड जकातनाका नाईकवाडी येथील दाजी नाईक या युवकाने डी जे फिटनेस नावाने व्यायामशाळा उभारली आहे. या व्यायाम शाळेचा शुभारंभ मळेवाड कोंडुरे सरपंच मिलन पार्सेकर यांच्या हस्ते फीतकापून तर उपसरपंच हेमंत मराठे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन करून गणपती व शिवप्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आला. या शुभारंभ प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करत असताना मा.पंचायत समिती सदस्य लाडोबा केरकर यांनी सद्यस्थितीत अंगमेहनतीची कामे ही कमी केली जात असल्याने व्यायामाची नितांत गरज आहे. आपलं आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम ही काळाची गरज आहे. त्यामुळे युवकांनी या व्यायाम शाळेचा उपयोग करून घ्यावा असे आवाहन केले.

तर बाळा शिरसाठ यांनी आपले मत व्यक्त करत असताना गावात अशा पद्धतीने अद्ययावत व्यायाम शाळा उभारली त्याबद्दल दाजी नाईक यांचे कौतुक करत व्यायामशाळेची गावासाठी गरज होती असे मत व्यक्त केले. ग्रामपंचायत सदस्य सानिका शेवडे यांनी व्यायाम शाळेचे व्यवस्थापक दाजी नाईक यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. तसेच आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी व्यायाम ही काळाची गरज असल्याने युवकांनी या व्यायाम शाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

उपसरपंच हेमंत मराठे यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना दाजी नाईक यांनी अद्ययावत सुरू केलेल्या व्यायाम शाळेला प्रथमतः शुभेच्छा देत कौतुक केले. दिवसेंदिवस नवनवीन आजार हे माणसाला त्रस्त करत असून आपले आरोग्य व शरीर सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम ही काळाची गरज असून यासाठी ही व्यायाम शाळा खऱ्या अर्थाने उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे गावातील व गावाच्या लगत असणाऱ्या गावातील युवकांनी या व्यायाम शाळेचा उपभोग घ्यावा असेही आवाहन केले.

तसेच मळेवाड कोंडुरे गावातील स्थानिक युवकांना आपण या व्यायाम शाळेमध्ये सवलत द्यावी असे आवाहन मराठे यांनी व्यवस्थापक दाजी नाईक यांना केले. ग्रामपंचायतच्या माध्यमातूनही गावात अद्ययावत व्यायाम शाळा सुरू करण्याचा मानस आहे. मात्र दाजी नाईक यांनी सदरची व्यायाम शाळा सुरू केल्याने ग्रामपंचायत कडून दाजी नाईक याना घेणार पूर्ण सहकार्य करणे ही ग्रामपंचायत ची जबाबदारी असल्याने नाईक याना ग्रामपंचायत चे पूर्ण सहकार्य लाभेल असे ही आश्वासित केले.

सरपंच मिलन पार्सेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना दाजी नाईक यांनी सुरू केलेल्या व्यायाम वेळेला शुभेच्छा देत या व्यायाम शाळेचा युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मधुकर जाधव, पोलीस पाटील दिगंबर मसुरकर, तंटामुक्ती अध्यक्ष अमित नाईक, डॉ. कामत, विद्याधर पाटणकर, सगुण जाधव, गुरु मुळीक, विजय मुळीक, नारायण नाईक, तुकाराम नाईक, बापू नाईक, बाबल नाईक, विजय चराटकर, नंदन परांजपे, राजन परब, प्रकाश राऊत, तात्या मुळीक, परशुराम मुळीक, उल्हास नाईक आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नंदू नाईक यांनी तर दाजी नाईक यांनी स्वागत केले.