सोलापूर : इंग्रजी माध्यमाच्या शाळांशी स्पर्धा करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांना घरघर लागली आहे. २०१६मध्ये सोलापूर जिल्हा परिषदेच्या तीन हजार शाळांवर तब्बल १२ हजार शिक्षक कार्यरत होते. पण, सद्य:स्थितीत दोन हजार ७९५ शाळांमध्ये केवळ नऊ हजार शिक्षक आहेत. सहा वर्षांत तब्बल ९० हजार विद्यार्थी कमी झाल्याने तीन हजार शिक्षक थेट कमी झाल्याची वस्तुस्थिती बिंदुनामावली अंतिम करताना समोर आली आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पदवीधर शिक्षक व उपशिक्षक यांच्यातून केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी अशा पदोन्नती मिळते. उर्वरित कार्यरत शिक्षक कोणत्या जातसंवर्गातील आहेत, कोणत्या जातसंवर्गाची पदे आरक्षणानुसार कमी आहेत, याची पडताळणी करून बिंदुनामावली अंतिम केली जाते. सध्या चार दिवसांपासून त्यावर रात्रंदिवस काम सुरू आहे. मंगळवारी (ता. ८) जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापतीच्या केबिनमध्ये युद्धपातळीवर बिंदुनामावलीची कार्यवाही सुरू होती.
राज्यातील सर्वच जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या पदभरतीला १५ ऑगस्टपासून सुरवात होणार आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षक नाहीत, असे चित्र आहे. दरम्यान, २०२१-२२च्या तुलनेत मागच्या वर्षी पटसंख्या पुन्हा कमी झाली असून, त्याचा फटका आता नवीन शिक्षक भरतीत निश्चितपणे बसणार आहे. आता आधार बेसड् संचमान्यता होत असल्याने ज्यांचे आधारकार्ड प्रमाणीकरण झाले, तेवढीच पटसंख्या ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे काहीजण अतिरिक्त होतील आणि सोलापूर जिल्हा परिषदेला केवळ ५०० शिक्षकांचीच भरती करता येईल, अशी स्थिती आहे.
झेडपी शाळांमध्ये ५०० शिक्षकांची भरती!
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची बिंदुनामावली आता अंतिम टप्प्यावर आहे. मागासवर्गीय कक्षाकडून त्यास अंतिम मान्यता मिळाल्यानंतर जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची रिक्तपदे भरली जाणार आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जवळपास ५०० शिक्षकांची भरती होईल, असा विश्वास प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना आहे.
गुरुवारी अंतिम होणार बिंदुनामावली
जिल्हा परिषदेच्या जिल्हाभरात दोन हजार ७९५ शाळा आहेत. त्या शाळांमधील दोन लाख विद्यार्थ्यांसाठी सध्या नऊ हजार शिक्षक कार्यरत आहेत. आता १५ ऑगस्टपासून शिक्षकांची रिक्तपदे भरली जाणार असल्याने बिंदुनामावली अंतिम करण्याची कार्यवाही जलदगतीने सुरू आहे. महिला व बालकल्याण समिती सभापतींच्या कार्यालयात बसून प्राथमिक शिक्षण खात्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कागदपत्रांची पडताळणी केली. गुरुवारी (ता.१०) सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाची बिंदुनामावली मागासवर्गीय कक्षाला सादर केली जाणार आहे.
झेडपी शाळांची सद्य:स्थिती
- एकूण शाळा
- २,७९५
- अंदाजे एकूण विद्यार्थी
- १.९४ लाख
- कार्यरत शिक्षक
- ८,८९२
- भरली जाणारी अंदाजे रिक्त पदे
- ५००



